मराठा आरक्षणासाठी शासनाला ४० दिवसांची दिलेली मुदत २४ तारखेला संपत आहे. मी, खानदानी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. सगळे मंत्रिमंडळ एकवटलं तरी मी माझी भूमिका विचलित होऊ दिली नाही. समाजानेही एकजूट दाखवावी. शासनाने कितीही डाव टाकू द्या ते उधळूनच लावू. जीव गेला तरी बेहत्तर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
पांगरी येथे रविवारी (दि.८) सभेत ते बोलत होते. १४ तारखेला आंतरवली सराटी येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला असून त्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी उपस्थित रहावे. उग्र आंदोलन, जाळपोळ करु नका. गुन्हे दाखल झाल्यास भविष्यात शिक्षणात तसेच नोकरीत अडचणी निर्माण होतील. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. आरक्षणासाठी तरुण मरायला लागले तर आरक्षण घेऊन करायचे काय ? असा सवाल त्यांनी केला. कुठलाही डाग समाजावर लागू देऊ नका असा सल्ला दिला.
ओबीसी आरक्षणासाठी विविध जाती मागास असल्याचे सिध्द होणे अपेक्षित असताना अनेक उपजातींचा ओबीसीत समावेश करुन शासनाने मराठा समाजाची खिल्ली उडवली आहे. ओबीसींचे आरक्षण २८ हून ३० टक्क्यांवर पोहचले, मात्र त्यास कुठलाही आधार नाही. देशातील एकमेव मराठा जात अशी आहे, ती मागास असल्याचे सिध्द झाले असून मराठा कुणबी असल्याचे ५ हजार पुरावे सापडले आहेत. या समाजाचा ओबीसीत समावेश झाला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. राज्यभरातील मराठ्यांना कुणबी दाखले तलाठी स्तरावर सरसकट मिळाले पाहिजे, अशी मागणी छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी केली. छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठीचे बारकावे सांगितले. आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, विठ्ठल उगले, आदी उपस्थित होते. तर पांगरीत उपोषणास बसणार पांगरीत जनावरांच्या चारा-पाण्यासाठीच्या आंदोलनात पालकमंत्र्यांनी लक्ष दिले नाही तर स्वतः यासंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि सिन्नर तालुक्यासह महाराष्ट्रात चारा-पाण्याची व्यवस्था करण्यास शासनास भाग पाडू. शासनाने दुर्लक्ष केल्यास स्वतः पांगरी येथे उपोषणास बसू असा इशारा त्यांनी दिला.