ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील निराधारांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे. आता एक हजार ऐवजी दीड हजार रुपयांची रक्कम निराधारांच्या हातात पडणार असल्याने निराधारांची दिवाळी गोड होणार आहे. पुणे जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सुमारे १३ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेमधून सुमारे दीड हजार कोटींचे अनुदान जिल्ह्यांना वितरीत केले आहे. येत्या महिनाभरात ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्या संदर्भात सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. निराधारांना दरमहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ५५६ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ९४० कोटी असा एकूण एक हजार ४९६ कोटी रुपयांचा निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता एक ऐवजी दीड हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.
१८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष, महिला तसेच अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोगसारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार, विधवा, घटस्फोटित, तसेच पोटगी न मिळालेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित महिला, तुरुंगात शिक्षा भोगलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त असे लाभार्थी हे संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट होतात. या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव तसेच २१ हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्याना राज्य सरकार १५०० रुपये दरमहा अर्थसहाय्य देते.