मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेकडे ओढा असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही कमी असली, तरी त्यात सरकारचा साथ सोडून येणाऱ्यांचा विशेष समावेश नव्हता. मात्र मुंबईत ‘उलटी गंगा’ वाहताना दिसत आहे.मुंबईतील भाजपच्या बड्या नेत्या पक्षाला रामराम ठोकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच उत्तर मध्य मुंबई लोकसभेतील ॲड. सुधीर खातू यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.सुधीर खातू हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे बडे नेते आहेत. सध्या या मतदारसंघातून पूनम महाजन भाजपच्या तिकिटावर लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे महाजन यांचं टेन्शन वाढणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी सुधीर खातू यांचे कौतुक केले. उद्धव ठाकरे म्हणाले, “राजकारणात साधारणत: पक्षप्रवेशाचा जो प्रवाह असतो, तो विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे असतो. पण सुधीर खातू यांनी हा प्रवाह उलटा फिरवला आहे. ते सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात आले, असं मी म्हणणार नाही. त्यांनी सत्ताधारी पक्षातून देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षाकडे (ठाकरे गट) प्रवाह सुरू केला””आताच आपण हुकूमशाहीची वळवळ गाडली नाही, तर आपल्या भगव्याला काही अर्थ राहणार नाही. आपल्या देशप्रेमाला काही अर्थ राहणार नाही” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आज उत्तर मध्य मुंबई लोकसभेतील ॲड. सुधीर खातू ह्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. pic.twitter.com/gCBNdm4zoo
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 8, 2023