पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार असलेल्या वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे काम सुरू आहे. (Chhatrapati Sambhajinagar News) याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगरात होणारे स्टेडियमही वाराणसीसारखेच व्हावे, यासाठी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत कामाला लागले आहेत. जी. श्रीकांत यांनी गरवारे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार एमआयडीसी, एमटीडीसीकडून सुमारे २७ एकर जागा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.तसेच एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेकल) स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. पंतप्रधानnarendra modi प्रतिनिधित्व करत असलेल्या वाराणसीमध्ये सध्या स्टेडियमचे काम सुरू आहे.
या कामाची माहिती महापालिका अधिकारी घेणार आहेत. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी चार महिन्यांपूर्वी घेतला आहे.त्यानुसार त्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्टेडियमसाठी निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता.त्यात एमआयडीसीकडून जागा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. गरवारे स्टेडियमशेजारील अडीच एकर जागा कलाग्रामसाठी एमटीडीसीला देण्यात आली होती. ही जागा परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्टेडियमच्या कामासाठी एसपीव्ही स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी आल्यानंतर एसपीव्ही स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.दरम्यान, वाराणसी येथे क्रिकेट स्टेडियमचे काम सध्या सुरू आहे. हे काम कशा पद्धतीने केले जात आहे, याची माहिती घेण्याची सूचना जी. श्रीकांत यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली आहे. आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्यासाठी पीएमसी म्हणून अजय ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी २६५ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. स्टेडियमसाठी महापालिका अर्थसंकल्पात टप्प्याटप्प्याने तरतूद करणार आहे. तसेच पॅव्हेलियनसाठी प्रायोजक घेऊन त्यांच्याकडून निधी उभारला जाईल, असे जी. श्रीकांत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.