नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर राज्यातील विविध मंत्र्यांनी केलेल्या विधानांनी त्याचा गुंता वाढत असतानाच, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीदेखील याबाबत हात झटकले आहेत. त्यांनी अतिशय धक्कादायक विधान केल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.पश्चिम विभागातील सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या (सीएचओ) दोनदिवसीय प्रादेशिक परिषदेला नाशिकमध्ये प्रारंभ झाला. या वेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल उपस्थित होते. या वेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यात सहभागी झाले होते. नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर विरोधक आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
या परिषदेत सहभागी होताना, डॉ. सावंत म्हणाले, नांदेड प्रकरणाची जबाबदारी म्हणून मला प्रश्न करू नका. त्याची जबाबदारी त्यांनी झटकली. ते म्हणाले, जे घडले ती मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे. संबंधित शासकीय रुग्णालय आरोग्य विभाग नाही, तर वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असल्याचे स्पष्ट करून या विभागाची औषध खरेदी रखडलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांकडून विनाकारण या प्रकरणाचा गवगवा केला जात असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
परिषदेला मार्गदर्शन करताना डॉ. सावंत म्हणाले, की नांदेडमध्ये जे घडले ती मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे. संबंधित शासकीय रुग्णालय हे आरोग्य विभाग नव्हे, तर वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत आहे, हे लक्षात घ्यावे. राज्यात औषधांचा तुटवडा, टंचाई आहे, खरेदी रखडली असल्याची ओरड केली जात आहे. मात्र, राज्यात औषधांचा तुटवडा नाही. खरेदीही रखडलेली नाही.ते म्हणाले, राज्य शासनाने खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या माध्यमातून खरेदी प्रक्रिया राबविली जाणार आहे. औषध खरेदी वेळेत व्हावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, तसे आदेशही काढण्यात आले आहेत. नांदेड प्रकरणावर विरोधकांकडून राजकारण केले जात असून, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातून डॉक्टरांचे खच्चीकरण होत आहे. आरोग्य हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. येथे राजकारण अयोग्य असल्याचे सांगत लोकांच्या भावना भडकविण्याचे काम विरोधकांनी करू नये, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.