उत्तर भारतातील राज्यांसह महाराष्ट्रातूनही मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच आता पुढील दोन तीन दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या चार ऑक्टोंबर पासून मान्सूनचा परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता परतीच्या वेळीच राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या तापमानात मोठी घट होत असून हळूहळू थंडी वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता थंडी आणि पाऊस असं दुहेरी वातावरणाचं चित्र सामान्यांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रातून माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. गुजरात आणि राजस्थान या राज्यांतून यापूर्वीच मान्सूनने एक्झिट घेतलेली आहे. पुढील एक ते दोन दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून शहरातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळं कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांनी हवामान अंदाज पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.