• Wed. Apr 30th, 2025

नांदेडमध्ये 62 मृत्यू; पण जबाबदार कुणीच नाही!:सलग पाचव्या दिवशीही नांदेडच्या रुग्णालयात 11 रुग्णांचा मृत्यू

Byjantaadmin

Oct 7, 2023

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या २४ तासांत तब्बल २४ रुग्णांचे मृत्यू झाले होते. यात १२ नवजातमुंबई अर्भकांचाही समावेश होता. हे प्रकरण राज्यभर गाजले. तेव्हापासून ५ ऑक्टोबरपर्यंत या रुग्णालयात रुग्णांचे मृत्युचक्र सुरूच आहे. या सहा दिवसांत तब्बल ६२ रुग्णांचे प्राण गेले. याबाबत टीकेची झोड उठली तरी राज्य सरकार मात्र चूक मान्य करायला तयार नव्हते. आरोग्य संचालकांनी तीन सदस्यांची समिती नेमून चौकशी केली. त्यातही अपेक्षेप्रमाणे रुग्णालय प्रशासनाला क्लीन चिट दिली. गंभीर अवस्थेत दाखल झालेले रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नसल्यानेच त्यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष या समितीने काढला आहे. त्यामुळे ६२ मृत्यूला कुणीच जबाबदार नाही का, असा सवाल मृतांचे नातेवाईक करत आहेत. कुरुळा (ता. कंधार) येथील मायलेकीच्या मृत्युप्रकरणी या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सरकारी अहवालाच्या आधारे त्यांच्यावरही कारवाईची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, ५ ऑक्टोबर रोज दिवसभरात आणखी ११ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. यात तीन नवजात बालकांचा समावेश आहे.

सरकारच्या तीनसदस्यीय समितीचा अहवाल : औषधे-उपकरणांचा तुटवडा नाहीच, डॉक्टर-आरोग्य कर्मचारी संख्याही पुरेशी
घाटीतील डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रणिता जोशी व जनवैद्यक अौषधचे डॉ. भारत चव्हाण यांच्या सरकारी समितीच्या अहवालात कुणीच दोषी सापडले नाही.

मृत्यूचे कारण : कमी वजनाचे, मुदतीपूर्व जन्मलेले अर्भक, ७५ ते ८० वर्षांच्या रुग्णांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांच्या चौकशी समितीने काढला आहे.
औषधांचा साठा : जीवनरक्षक औषधींचा कुठेही तुटवडा किंवा टंचाई जाणवली नाही. काही नेहमीच्या वापरातील मूलभूत औषधींचा तात्पुरता तुटवडा होऊ शकतोे, पण त्याचेही नियोजन वेळोवेळी केले जाते.
डॉक्टरांची जबाबदारी : रुग्णालय प्रशासनाच्या कामात काहीच उणिवा दिसल्या नाहीत. डॉक्टर रुग्णांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. फक्त अतिगंभीरतेमुळे काही रुग्णांचे मृत्यू झाले.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा : खासगी वैद्यकीय व्यावसायिक व नर्सिंग स्टाफ बाहेरून प्रशासनाच्या मदतीसाठी रुग्णालयात नियुक्त केला अाहे. त्यांच्याकडून रुग्णसेवेत कुठलीही कसूर होताना दिसली नाही.
उपचाराचे काय ? : आजही ८०० रुग्णांवर उपचार, अनेक जण बरे होऊन घरी गेले. संपूर्ण परिस्थिती बिघडण्यासारखे वातावरण नाहीच.

सत्यशोधन समितीचे सरकारच्या नििष्क्रयतेवर बोट : डॉक्टरांचे प्रयत्न… पण वाढतेे रुग्ण, अपुरी औषधे व मनुष्यबळ हेच मृत्यूंचे कारण

जनआरोग्य अभियानाच्या सत्यशोधन समितीने नांदेडमधील मृत्यूंची नेमकी कारणे अभ्यासली. समितीचे डॉ. अभय शुक्ला यांनी त्यांचे निष्कर्ष खास ‘दिव्य मराठी’ला उपलब्ध करून दिले.​​​​​​​
मृत्यूचे कारण : आजारी मुलांसाठी अत्यावश्यक औषधांची कमतरता दिसली. संसर्गजन्य आजारांच्या साथीमुळे ताण वाढला होता. २४ मृतांपैकी १७ रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर खासगी रुग्णालयातून आलेले.
औषधांचा साठा : औषधे आणि उपकरणे याची पराकोटीची कमतरता आहे. अपुऱ्या औषधांमुळे व साधनांमुळे डॉक्टरांना गंभीर रुग्णांच्या उपचारातही प्रसंगी तडजोड करण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता.
डॉक्टरांची जबाबदारी : या रुग्णालयात ३०० रुग्णांमागे केवळ ५ निवासी डॉक्टर उपलब्ध आहेत. ते रुग्णांना वाचवण्यासाठी २४ तास झगडत आहेत. मात्र अपुऱ्या साधनांमुळे व कर्मचारी कमतरतेपुढे तेही हतबल.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा : पीडिअॅट्रिक आयसीयूमध्ये २ बालरुग्णांमागे एक नर्स असावी असा निकष आहे. मात्र या रुग्णालयात ६० बालरुग्णांमागे फक्त ३ नर्सेस. ५०० नर्सेसची पदे असताना प्रत्यक्ष २७९ नर्सेसच उपलब्ध.
उपचाराचे काय ? मृतांची संख्या वाढल्यावर येथे औषधांचा ओघ सुरू झालाय, मात्र तोपर्यंत किमान अत्यावश्यक औषधेही उपलब्ध नव्हती.​​​​​​​

​​​​​​​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed