• Wed. Apr 30th, 2025

ग्रामीण भागात क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करणार – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

Byjantaadmin

Oct 6, 2023

मुंबई,  : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सर्व क्रीडाविषयक सोयीसुविधांनी युक्त तालुका क्रीडा संकुल निर्मितीला प्राधान्य आहे. क्रीडा विभागाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील तालुका क्रीडा संकुलाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिले. मौजे वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील विस्तारित क्रीडा संकुलासाठी तत्वत: मंजुरी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. बनसोडे यांनी मोहोळ क्रीडा संकुल आणि वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे तालुका क्रीडा संकुलाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार यशवंत माने,  भारत शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र साठे, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हांजे, उपसंचालक (क्रीडा) अनिल चोरमले, मोहोळ तालुका  क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, उत्तर सोलापूर तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, हरिभाऊ घाडगे, समाधान कराड, भाऊसाहेब लामकाणे आदींची यावेळी उपस्थिती होते.

मंत्री श्री. बनसोडे यांनी मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असल्याचे सांगितले. त्यामुळे येथील तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा असणे अपेक्षित आहे. क्रीडा विभागाने त्या अनुषंगाने सुधारित परिपूर्ण प्रस्ताव तत्काळ सादर करावा. त्यास शासन निश्चितपणे सहकार्य करेल.  राज्य क्रीडा समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्तर सोलापूर तालुका क्रीडा संकुल सोलापूर महानगरपालिका हद्दीत येते. जेथे जागा अपुरी असल्यामुळे विस्तारित क्रीडा सुविधा निर्माण करण्यास मर्यादा येत असल्याची बाब आमदार श्री. माने यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सध्या वडाळा येथे विस्तारित क्रीडा संकुलासाठी तत्वत: मंजुरी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव तालुका आणि जिल्हा पातळीवरुन तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed