• Wed. Apr 30th, 2025

मी सांगून ठेवतोय, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मविआमध्ये फूट…

Byjantaadmin

Nov 18, 2022

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या विधानांची जोरदार चर्चा चालू आहे. हिंगोलीतील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून भाजपानं काँग्रेस आणि त्यांच्यासह शिवसेनेवरही परखडपणे टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असणाऱ्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न भाजपाकडून उपस्थिक केला जात होता. यावर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर आता संजय राऊतांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून दोन दिवसांपूर्वी हिंगोलीमध्ये यात्रेतील सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपली भूमिका मांडली. सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटिशांची माफीही मागितली होती, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. याच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचं एक पत्रही दाखवलं. त्यामुळे या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

महाविकास आघाडीत खरंच फूट पडणार?

दरम्यान, एकीकडे ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली असली, तरी भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडीच्या बाजूने आपण असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या विधानानंतरही काँग्रेसशी असलेली आघाडी कायम असल्याचेच संकेत उद्धव ठाकरेंनी दिले असताना आता संजय राऊतांनी त्याच्याउलट सूचोवाच केले आहेत. या विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, अशी शक्यता संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते. मी तुम्हाला सांगून ठेवतोय. कारण वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील”, असं राऊत म्हणाले.”काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलंय की वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो”, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *