काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची शेगावमध्ये आज सभा होणार आहे. ही सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे. राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मनसेकडून या सभेत काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे. “मनसेच्या या काळ्या झेंड्यांना आम्ही गुलाबाच्या फुलानं उत्तर देऊ”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
“राहुल गांधींनी सावरकरांविषयी मांडलेल्या भूमिकेव्यतिरिक्त काही वेगळी माहिती मनसेकडे असल्यास त्यांनी ती मांडावी. हा वैचारिक महाराष्ट्र आहे. काँग्रेसची ही विचारांची यात्रा आहे. ही यात्रा आता जनतेची झाली असून या यात्रेला विरोध करायचा असल्यास मनसेनं तो करावा”, असंही पटोले म्हणाले आहेत. दरम्यान, पत्रकाराने मनसेच्या इशाऱ्याबाबत प्रश्न विचारताच कोण मनसे? असा सवाल करत नाना पटोलेंनी ‘एबीपी माझा’शी बोलताना मनसेची खिल्ली उडवली.
काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. आमच्या अविनाश यांनी अनेक मोठ्या भाईंची भाईगिरी उतरवली आहे, आता पप्पूंची पप्पूगिरी उतरवण्यासाठी जात आहोत,” असा इशारा संदीप देशपांडे यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला होता. यावर “अशा किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.