राज्यातील आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले असताना राज्यातील एक फुल दोन हाफ कुठे बसले आहेत? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यातील एक फुल आणि एक हाफ केंद्रात बैठकीला बसले आहेत. तर दुसरे हाफ कुठे गेले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाच चौकशी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. नांदेड जिल्हा रुग्णालयातील अधिष्ठांतावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल झाला असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
नांदेडमधील अधिष्ठांना मस्तवाल खासदारांनी शौचालय साफ करायला लावले. हे चुकीचेच आहे. मात्र, त्यामुळे त्या खासदारावर गुन्हा दाखल झाला आहे. त्या अधिष्ठांतांवर दबाव टाकण्यासाठीच अधिष्ठांतावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. केवळ नांदेडच्या अधिष्ठांतांवरच गुन्हा दाखल का करण्यात आला? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील संबंधित जबाबदार व्यक्तीवरही कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
आरोग्य यंत्रणेला बदनाम करण्याचा डाव
राज्यातील याच आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आपण कोरोनाचा सामना केला होता. मात्र, आता त्याच आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सध्याच्या सरकारला राज्याचे आरोग्य संभाळता येत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. कोरोना काळातही आम्ही औषधांचा तुटवडा होऊ दिला नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. विना निविदा औषधी खरेदी म्हणजे भ्रष्ट्राचाराला आमंत्रण असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
जाहिरातीसाठी पैसे मात्र, औषधी खरेदीला पैसे नाहीत
सध्या सरकारकडे जाहिराती करायला पैसे आहेत. मात्र, औषधी खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळेच रुग्णांचे बळी गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात आजारांची नाही तर भ्रष्ट्राचाराची लाज वाटत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. सर्व सरकारी दलालांची चौकशी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
नागपूर पाण्यात असताना मुख्यमंत्री अभिनेत्यांसोबत फोटो काढण्यात व्यस्त
नागपूरमध्ये पूर आल्यानंतर तेथे जाण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबिय चित्रपटातील अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत फोटो काढण्यात व्यस्त होते, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तुम्ही हिंदू-मुस्लिम करतात, आता नागपूरमधील नागरिकांच्या घरात गणपती बसलेले नव्हते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आरोग्य खात्याचे टास्क फोर्स काय करतेय?
आरोग्य विभागाच्या माध्यमातून माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात टास्क फोर्स स्थापन करण्यात आली होती. ती टास्क फोर्स आता काय करतेय? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या टास्क फोर्समध्ये अनेक तज्ज्ञांचा समावेश होता, त्यांचा वापर आता का करण्यात येत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोरोना काळात टास्क फोर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम झाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.