मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री तानाची सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब हलक्यात घेऊ नये. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर मराठा क्रांती मोर्चाे राज्य समन्वयक योगेश केदार यांनी सांगितले की, मंत्री सावंत यांनी आधी सकल मराठा समाजाची माफी मागावी. तानाजी सावंत यांनी मराठा समाजाने ओबीसी आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना तारतम्य बाळगावे. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का? जर तुम्हाला उघड समाजाच्या भूमिकेसोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा.
योगेश केदार म्हणाले, आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाहीत. ‘मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण’ ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली असे बिनबुडाचे आरोप करू नये. तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की काहीही बोलले तर समाज सहन करेल? सत्तेची हवा एवढी पण डोक्यात जाऊ देऊ नका. आणि हो ‘एससी’मधून आरक्षण द्या, अशी भूमिका मराठा समाजाने कधीच घेतली नव्हती आणि भविष्यातही कधी घेणारही नाही. त्यामुळे असले काही बोलून पत घालवून घेऊ नका.
योगेश केदार म्हणाले, पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही गेल्या सरकारवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गाजर आंदोलन केले. शरद पवार यांच्याविरोधातदेखील खंजीर आंदोलन केले. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यादेखील विरोधात खंजीर आंदोलन केले. अजित पवार यांना जाहीर भाषणात थांबवून ओबीसीमधूनच आरक्षण मागितले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधात असतानाही आम्ही त्यांच्या घरावर आंदोलन केले होते. हे तुम्हाला तर नक्की माहिती होते.
काय म्हणाले तानाजी सावंत!
सत्तांतर होताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. मात्र, गेली 2 वर्षे हे सर्व जण शांत होते, असे तानाजी सावंत यांनी उस्मानाबादमध्ये जाहीर सभेत म्हटले आहे.
वादग्रस्त वक्तव्य नेमके काय?
सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली असे वादग्रस्त तानाजी सावंत यांनी केले आहे. सावंत म्हमाले, यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे. याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे. पण, मराठा आरक्षणाचा विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे. आरक्षणावरून राष्ट्रवादीने दुटप्पी भूमिका घेतल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.