गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी देशभरात वेगवेगळ्या प्रकारे देशवासीय महात्मा गांधींना अभिवादन करतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीत राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केलं. काही मान्यवरांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सोशल मीडियावर महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त खास संदेश पोस्ट केला आहे. तसेच, मनसे रिपोर्ट या ट्विटर हँडलवर राज ठाकरेंच्या भूमिकेची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
काय आहे राज ठाकरेंच्या पोस्टमध्ये?
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये महात्मा गांधी आजही अनुकरणीय का आहेत? यासंदर्भात मत मांडलं आहे. “आज महात्मा गांधीजींची जयंती. व्यक्तिगत ते सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेसाठीचा आग्रह, स्वच्छ, निर्मळ मन आणि अर्थात स्वच्छ हेतू याच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली. जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतीलही किंवा नसतीलही. पण आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं, इतकं संचित मागे ठेवून गेलेल्या ह्या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन”, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.