आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप ठरले नसले तरी संभाव्य उमेदवार तयारीला लागले आहेत. (Sambhajinagar Loksabha ) यामध्ये आणखी एक नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे माजी कन्नडचे माजी आमदार आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी छत्रपती संभाजीनगरचा निकाल फिरवला होता त्या हर्षवर्धन जाधव यांचे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत `एक मराठा लाख मराठा`च्या भारावलेल्या वातावरणाने jadhav यांची झोळी तब्बल २ लाख ८३ हजार मतांनी भरली होती. याचा फटका सलग चारवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या shivsena चंद्रकांत खैरेंना बसला होता. कुणाच्याही ध्यानी-मनी नसतांना एमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी ऐतिहासिक विजय मिळवत शिवसेनेला धक्का दिला होता.
अर्थात त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कन्नडच्या मतदारांनी हर्षवर्धन जाधव यांनाही घरी पाठवले. गेल्या तीन-साडेतीन वर्षात हर्षवर्धन जाधव यांनी कौटुंबिक वादांवर मात करत २०२४ च्या विधानसभेची तयारी कन्नडमधून सुरू केली होती.दरम्यान, तेलंगणाच्या बीआरएस पक्षाच्या मोहात जाधव पडले आणि त्यांनी काही महिने तेलंगा पॅटर्नचा उदोउदो कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केला. पण बीआरएसमध्येही त्यांचे बिनसल्याचे सध्या चित्र आहे.
राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतांना जाधव यांना लोकसभा खुणावू लागली आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करत संसदेत कायदा करून आरक्षणाची मर्यादा वाढवून टिकणारे आरक्षण द्या, मराठा समाजा प्रमाणेच खुल्या प्रवर्गालाही २० टक्के आरक्षणाची मागणी करत जाधव यांनी वेगळी भूमिका घेतली. ब्राम्हण, मुस्लिम, जैन व खुल्या प्रवर्गातील इतर जातींच्या हलाखीची परिस्थिती, त्यांच्या पाल्यांना आरक्षण नसल्यामुळे शिक्षण घेता येत नाही, हा मुद्दा जाधव सध्या रेटत आहेत.
अडीच तीन वर्षापासून कन्नडमधून विधानसभा लढवण्याची तयारी करणाऱ्या जाधव यांनी आता दोनशे टक्के संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार असल्याचे सांगण्यास सुरूवात केली आहे. माझ्यामुळे मुसलमान निवडून आला हा आरोप होत असला तरी पुन्हा आपण लोकसभा लढणार हे त्यांनी ठासून सांगण्यास सुरूवात केली आहे. गेल्यावेळी जाधव यांच्या उमेदवारीने खासदारकीची लाॅटरी लागलेल्या इम्तियाज यांच्यावरही जाधव यांनी आगपाखड केली आहे.गेल्या चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे, परंतु मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन यांनी पुन्हा लोकसभा लढवण्याची केलेली घोषणा यावेळी इम्तियाज जलील यांना फायद्याची ठरणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महायुती-महाआघाडीचे उमेदवार ठरलेले नाहीत, एमआयएमकडून इम्तियाज जलील हेच पुन्हा नशिब आजमावणार आहेत. यावेळी त्यांना वंचित आघाडीची साथ नाही, त्याची भरपाई जाधव यांच्या उमेदवारीने भरून निघणार का? की शिवसेना-राष्ट्रवादीत पडलेली फूट एमआयएमच्या पथ्यावर पडणार हे लवकरच स्पष्ट होईल.