• Tue. Apr 29th, 2025

चांद्रयानसाठी लॉन्चपॅड तयार करणारा तंत्रज्ञ विकतोय इडली; व्यथा वाचून ….

Byjantaadmin

Sep 20, 2023

रांची: ऑगस्टच्या २३ तारखेला चांद्रयान-३ नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्याची किमया याआधी कोणत्याही देशाला जमलेली नव्हती. ती भारतानं करुन दाखवली. इस्रोचं जगभरात कौतुक झालं. भारतीयांची छाती अभिमानानं फुलली. पण रांचीतील हेवी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनच्या (एचईसी) अभियंत्यांना पगार मिळालेला नाही. याच अभियंत्यांनी चांद्रयानसह अन्य मोहिमांमध्ये वापरण्यात आलेलं लॉन्चपॅड तयार केलं आहे. सरकारी नोकरी असूनही गेल्या १८ महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेलं नाही.

isro

एचईसीमध्ये कार्यरत असलेल्या दीपक कुमार यांची घरातील आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. सध्या ते इडली विकून उदरनिर्वाह करत आहेत. १८ महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. अशा परिस्थितीचा सामना करत असलेले दीपक कुमार एकमेव नाहीत. एचईसीच्या २८०० कर्मचाऱ्यांची हीच परिस्थिती आहे. दीपक यांची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दीपक यांच्यासमोर कोणताच पर्याय न राहिल्यानं त्यांनी इडली आणि चहाची टपरी सुरू केली.झारखंडची राजधानी रांचीतील धुर्वा परिसरात असलेल्या जुन्या विधानसभेसमोर दीपक यांचं लहानसं दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून ते इथे इडली विकतात. सकाळी इडली विकून ते कामाला जातात. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पुन्हा इडली विकतात आणि मग घरी परततात. २०१२ मध्ये दीपक एका खासगी कंपनीत काम करायचे. त्यांना महिन्याला २५ हजार रुपये पगार मिळायचा. एचईसीमध्ये ते केवळ ८ हजार रुपयांच्या पगारावर रुजू झाले. सरकारी नोकरी असल्यानं त्यांनी एचईसीची नोकरी स्वीकारली.’पगार मिळाला नाही म्हणून सुरुवातीला क्रेडिट कार्डनं घर चालवलं. पण दोन लाखांचं कर्ज झालं. मला दिवाळखोर घोषित करण्यात आलं. त्यानंतर नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले. आता डोक्यावर ४ लाखांचं कर्ज आहे. अनेकांनी उधारी बंद केली. पत्नीचे दागिने गहाण ठेवले आहेत. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मी इडलीचं दुकान सुरू केलं. दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची इडली विकतो. त्यातून कधी ५० तर १०० रुपये सुटतात. याच पैशातून सध्या घर चालतंय,’ अशी व्यथा दीपक यांनी मांडली.२००३ ते २०१० या कालावधीत एचईसीनं इस्रोला मोबाईल लॉन्चिंग पॅड पेडस्टल, हॅमर हेड टॉवर क्रेन, ईओटी क्रेन, फोल्डिंग कम वर्टिकल रिपोजिशनेबल प्लॅटफॉर्म, हॉरिझाँटल स्लायडिंग डोर्सचा पुरवठा केला. पण चांद्रयान-३ मोहिमेतील कोणतंही उपकरण तयार करण्यात एचईसीनं मदत न केल्याचा सरकारचा दावा आहे. यावर एचईसीचे व्यवस्थापक पुरेंदू दत्त यांनी प्रतिक्रिया दिली. तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारची बाजू खरीही असेल. कारण चांद्रयान-३ साठी कोणताही वेगळा लॉन्चपॅड तयार करण्यात आलेलं नव्हतं. पण भारतात एचईसीशिवाय कोणतीही कंपनी लॉन्चपॅड तयार करत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed