नवी दिल्ली : ऐतिहासिक जुन्या संसदेला अलविदा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अतिशय भावनिक भाषण केलं. जुन्या संसदेतून नव्या संसदेत जाताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ झालाय. माझ्या मनात अनेक आठवणींचे ढग दाटून आलेत. भारत देशाला स्वातंत्र मिळाल्यासून भारताकडे एका शंकेच्या नजरेने पाहिले जायचे. परंतु गेल्या ७५ वर्षात भारताने सगळ्याच क्षेत्रात अद्वितीय प्रगती केली. यात नेहरूंजींपासून-इंदिरा गांधी आणि अटलजींपासून-मनमोहन सिंग या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. देशाच्या प्रगतीसाठी कष्ट घेतलेल्या सगळ्यांना नमन करतो, अशा भावूक शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेचा उंबरठा ओलांडताना संसदेतील गत आठवणींना उजाळा दिला.
आजपासून संसदेच्या ५ दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुरूवातीलाच जी २० परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भारत सरकारचं कौतुक केलं. तसेच विशेष अधिवेशनाची सदनाला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी निवेदनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पुकारलं. त्यानंतर मोदींनी जवळपास सव्वा तास भाषण करताना संसदेच्या इतिहासातील प्रसंगांना उजाळा देताना संबंधित नेत्यांचं मोठेपण अधोरेखित केलं. एकप्रकारे त्यांनी संसदीय इतिहासाचं सिंहावलोकन केलं
आज भारताकडे सगळे जण विश्वमित्र म्हणून पाहतायेत. याचे मूळ कारण म्हणजे वेदांपासून विवेकानंदांपर्यंत आपल्याला मिळालेला सबका साथ सबका विकास हा मंत्र…जेव्हा आपण या सदनाला अलविदा करतोय तेव्हा आपल्या सगळ्यांचं मन जड झालंय, भावना दाटून आल्या आहेत. आपल्या सर्वांच्या आठवणी जुन्या संसद भवनाशी जोडल्या गेल्या आहेत. इमारत जरी ब्रिटिशांनी बांधली असली तरीही या इमारतीच्या उभारणीसाठी आपल्या देशवासीयांनी घाम गाळला आहे. स्वातंत्र्य प्राती झाल्यानंतर गेल्या ७५ वर्षांत आपण या सदनात घडलेल्या अनेक घटना पाहिल्या आहेत. ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे, असं मोदी म्हणाले.
आज भारताचा जगात गवगवा, त्याचं कारण म्हणजे ७५ वर्षीय संसदीय इतिहासाचा सामूहिक परिणाम!
आपण आता नव्या संसद भवनात प्रवेश करणार आहोत. मात्र हे संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना इतिहास सांगेन. भारताच्या इतिहासाचा सुवर्ण अध्याय काय होता त्याची ओळख आपण जगाला करून देऊ. अमृतकाळात आपण आता नवी स्वप्नं, नवी उर्जा, नव्या संकल्पना घेऊन पुढे जात आहोत. आज भारताचा जगात जो गवगवा होतोय, त्यासाठी आपल्या ७५ वर्षीय संसदीय इतिहासाचा सामूहिक परिणाम कारणीभूत आहे, असंही मोदी म्हणाले
नेहरू-इंदिरा गांधींना नमन, भगतसिंगांना सलाम
पंडित नेहरू आणि शास्त्रीजींपासून ते अटलबिहारी आणि मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांनी देशाला नवी दिशा दिली आहे. आज त्यांना धन्यवाद देण्याची, त्यांचे आभार माननण्याची ही वेळ आहे. या सदनाला समृद्ध करण्यासाठी आणि देशातील सामान्य नागरिकाचा आवाज देण्यासाठी प्रत्येकाने काम केले आहे… जेव्हा देशाने राजीवजी, इंदिराजी यांना गमावले, तेव्हा या सभागृहाने त्यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहिली. प्रत्येक लोकसभा अध्यक्षाने हे सभागृह सुरळीत चालवले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेले निर्णय आजही दिशादर्शक मानले जातात. मालवणकरजींपासून ते सुमित्राजींपर्यंत प्रत्येकाची स्वतःची शैली आहे. प्रत्येकाने नियम आणि कायद्याच्या बंधनात हे सभागृह चालवले. आज मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि सलाम करतो