राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. याचा फायदा ९० हजार कर्मचाऱ्यांना होईल. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे १५ कोटींचा बोजा पडणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे राज्य सरकारला तातडीने हा निर्णय घ्यावा लागला आहे. महागाई भत्ता तातडीने लागू करावा या मागणीसाठी एसटी महामंडळातील संघर्ष एसटी कामगार युनियन, एसटी कर्मचारी काँग्रेस, एसटी कामगार संघटना आणि एसटी कामगार सेना अशा सर्व सर्व संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के भत्ता आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के मिळत होता. चार महिन्यांपासून महागाई भत्त्याबाबत निर्णय प्रलंबित होता. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ३४ टक्के महागाई भत्ता देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, पण महामंडळाची बैठक होत नव्हती. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन खातेही आहे.