• Wed. Apr 30th, 2025

बाळासाहेब असते तर ढोंग्यांना सोलून, फोडून काढले असते: ठाकरेंची टीका

Byjantaadmin

Nov 17, 2022

भाजपने ढोंगाशी ‘निकाह’ लावून सरकार बनवले व त्या ढोंगालाच ते ‘शिवसेना’ मानत आहेत. आज बाळासाहेब असते तर या ढोंग्यांना शिवतीर्थावरच सोलून आणि फोडून काढले असते, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गट व भाजपवर केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. त्यानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मुखपत्र सामनातून भाजप तसेच शिंदे गटावर जळजळीत टीका करण्यात आली आहे. शिवसेना या संघटनेचे सेनापती बाळासाहेब ठाकरे होते व आजही आहेत. त्या संघटनेच्या पाठीत भाजपने चाळीस खंजीर खुपसून देशद्रोहच केला. हा देशद्रोहासारखाच प्रकार आहे, अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली आहे.

शिंदे गट ढोंग करतोय

ठाकरे गटाने म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने महाराष्ट्र आणि देश आजही भारावलेला आहे. मात्र, महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवून ‘बदला’ घेतला म्हणून ज्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटतात त्यास महाराष्ट्रीय मातीचा माणूस कधीच म्हणता येणार नाही.

शिवसेनेचा सूर्य गिळण्याचा प्रयत्न

बाळासाहेबांना अभिवादन करताना ठाकरेंनी म्हटले आहे की, महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या पायरीवरचे एक पायपुसणेच झाले होते. त्या वेळी बाळासाहेबांच्या विचारांची वीज कडाडली व संपूर्ण महाराष्ट्र त्या विचाराने उजळून निघाला. तो प्रकाश, ते तेज आजही कायम आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न आजपर्यंत काय कमी झाले? मात्र त्या सगळ्यांना शिवसेना पुरून उरली. आता शिवसेनेचा सूर्य गिळण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण या सूर्याच्या प्रखर तेजाने दुश्मन जळून खाक होईल.

मिंधेंसमोर सत्तेची हाडके

ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटले आहे की, कालचे वर्ष व आजचे वर्ष यात मोठा फरक आहे. भारतीय जनता पक्षाने ‘बदला’ घ्यायचा म्हणून सत्तेचा गैरवापर करून शिवसेना फोडली. ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले. अर्थात हा बदला नसून ‘राष्ट्रद्रोह’ आहे. शिवसेनेतील एका ‘डरपोक’ गटास आपले लाचार व मिंधे बनवून त्याच्या समोर सत्तेची हाडके टाकली गेली. हा कुणास बदला वगैरे वाटत असेल तर महाराष्ट्राची 11 कोटी जनता या बदल्याचा महासूड घेतल्याशिवाय राहणार नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील विजयाने ते सिद्ध झाले आहे. लोकांची आजही शिवसेनेवर श्रद्धा आहे. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे करीत आहेत.

ठाकरेंनी म्हटले आहे की, आज बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे. बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते. त्यांनी ढोंगाचा नेहमीच तिरस्कार केला. महाराष्ट्राच्या मातीत ढोंगाला स्थान नाही. ढोंगाला लाथ मारा असे बाळासाहेब जाहीरपणे सांगत. महाराष्ट्राचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी त्यांच्या चाळीस बेइमान खंजिरांसह शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. बाळासाहेब सगळ्यांचे होते; पण त्यांनी बेइमानीस कधीच थारा दिला नाही.

बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

सामनात पुढे म्हटले आहे की, बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते. त्यांनी बेइमानीस कधीच थारा दिला नाही. बाळासाहेब हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते. ज्या महाराष्ट्राच्या मातीचे, ‘मराठी’ समाजाचे आपण घटक आहोत, तो महाराष्ट्र, मराठी समाज विस्कळीत झाला आहे. त्याला राजदरबारात पिंमत नाही. त्याला सार्वजनिक मत नाही. त्याला रोज अपमान आणि अवहेलनेस सामोरे जावे लागत आहे. ‘स्वाभिमान’ आणि ‘तेज’ या शब्दांशी त्याचा काही संबंध उरलेला नाही. त्याला रोज लाथाडले जात आहे, हे बाळासाहेबांनी पाहिले, मनावर घेतले. परिणामी मराठी माणूस व महाराष्ट्रावरील अन्यायाविरुद्ध लढायचे आणि त्यासाठी शिवसेनेच्या विचारांची मशाल धडधडत ठेवायची हेच आपले ध्येय असे त्यांनी ठरवून टाकले. शिवसेनेला लढत ठेवले व शेवटी लढता लढता एका महान योद्धय़ाप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *