सध्या राज्यात वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती चालू आहे. पण विरोधक चुकीच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. ते सकाळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कंत्राटी भरतीच्या संदर्भात अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि ते काहीपण चुकीच्या बातम्या पसरवतात, असा आरोपही अजित पवार यांनी केला. कारण नसताना मला ट्रोल केले जात असल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
या संदर्भात अजित पवार म्हणाले की, वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती चालू आहे. या संदर्भातला आढावा मी घेतला. अनेक ठिकाणी स्टाफ कमी आहे. तो स्टाफ भरण्याची प्रक्रिया चालू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, शिक्षण विभागातही आम्ही भरती करणार आहोत. ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे, त्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना आपण तात्पुरते घेतल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. भरती तात्काळ करावी लागते नाहीतर काही जण लगेच कोर्टात जातात असेही अजित पवार म्हणाले.
सर्वात मोठी भरती करणार
राज्यातील विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राज्य सरकार लवकरच वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही राज्यातील आतापर्यंत सगळ्यात मोठी भरती असेल, असा दावाही त्यांनी केला. आत्तापर्यंत एवढी मोठी भरती कोणत्याही सरकारच्या काळात झाली नव्हती, असे अजित पवार म्हणाले.