• Wed. Apr 30th, 2025

ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या

Byjantaadmin

Sep 15, 2023

गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्याच पतीने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. पहाटे 3 च्या सुमारास राहता यांचे वडील रुग्णालयातून घरी परतल्यानंतर ही घटना उजेडात आली. ही घटना घडली तेव्हा राहत यांची दोन्ही मुले घटनास्थळी उपस्थित होते.

 

चारित्र्याच्या संशयातून घडली घटना

यासंबंधीच्या वृत्तानुसार, कुरखेडा येथील शिवसैनिक नजद गुलाब सय्यद यांची मुलगी तथा ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या शहरप्रमुख राहत सय्यद आपल्या वडिलांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर पती व 2 मुलांसह राहत होत्या. आरोपी पती ताहेमिम त्यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यावरून गुरुवारी मध्यरात्री त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच राहत यांची हत्या झाली.राहत यांची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने नदीवर जाऊन आंघोळ केली. रक्ताने माखलेले कपडे धुतले. त्यानंतर त्याने सरळ पोलिस ठाणे गाठून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली.

15 दिवसांपूर्वीच झाली होती सुटका

उल्लेखनीय बाब म्हणजे, राहत सय्यद यांच्या पतीला काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमध्ये हरणाची शिंगे विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 15 दिवसांपूर्वीच तो जामिनावर घरी आला होता. लग्नापूर्वी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर ताहेमिम व राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते.

राहत यांचे वडील होते रुग्णालयात

मृत राहत यांचे वडील नजर सय्यद यांची प्रकृती बरी नव्हती. ते रुग्णालयात भरती होते. शुक्रवारी पहाटे ते घरी आले असता घाबरलेल्या नातवंडांनी त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर त्यांनी तत्काळ वरच्या मजल्याकडे धाव घेतली असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राहत यांचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी त्याची खबर पोलिसांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed