सोलापूर लोकसभा मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची प्रवक्तेपदी निवड केली. स्थानिक चेहरा, विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याची क्षमता असल्याने ढोबळेंसह त्यांची कन्या अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांची लोकसभा किंवा विधानसभेसाठी भाजपकडून विचार होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपकडून कन्या किंवा आपली उमेदवारी निश्चितीसाठीच ढोबळेंनी प्रवक्तेपदाची जबाबदारी स्विकारल्याचे सोलापूर राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी व पालकमंत्री म्हणूनLAXMAN DHOBLE यांनी सुमारे २५ वर्षे कारकिर्द गाजवली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढोबळेंचे राजकीय पुनर्वसनासाठी भाजपने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली. पक्षाने मोठा विश्वास ठेवून प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आणि ती मी समर्थपणे पार पाडेन, असे ढोबळेंनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्यांनी लोकसभा किंवा विधानसभेची उमेदवारी निश्चितीच्या अटीवर प्रवक्तेपदाची जबाबदारी स्वीकारल्याचे चर्चा आहे.
सोलापूरमध्ये विद्यमान खासदार भाजपचा असला तरी पाच वर्षात पक्षाची ध्येय धोरणे आणि भूमिका व प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यात ते कमी पडले स्पष्ट झाले आहे. पर्यायाने भाजप नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याची माहिती आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, पंढरपूरमध्ये पक्षाचे आमदार आहेत. अजित पवार सत्तेत आल्याने मोहोळमध्येही मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत सोलापूरमध्ये पुन्हा खासदार करणे शक्य असले तरी भाजपला स्थानिक चेहऱ्याची गरज भासणार आहे. यातूनच सोलापूर लोकसभेसाठीचे प्रमुख दावेदार मानले जाणाऱ्या प्रा. लक्ष्मण ढोबळेंवरच प्रवक्तेपदाची जबाबदारी दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
भाजप २०२४ च्या निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. भाजपसमोर काँग्रेसच माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार PRINITI SHINDE यांच्या रुपाने तगडे आव्हान आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तोडीस तोड भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कच्चेदुवे माहीत असल्याने ढोबळे विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देतील. याशिवाय वंचीत समाजातील मते ढोबळेंमुळे भाजपाच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयात उमेदवाराऐवजी जिल्ह्यात जनसंपर्क व परिचित, स्थानिक चेहऱ्याच्या दृष्टीने लक्ष्मण ढोबळे यांचे नाव भाजपमध्ये आजही आघाडीवर आहे.