राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अधिकृत ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने एक्स (पूर्वीचे ट्विटर) कंपनीने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंटवरून नेमक्या कोणत्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सोशल मिडियावरही दोन गट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप सोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. शरद पवार यांचा एक गट तर दुसरा गट अजित पवारांसोबत आहे. पक्षाचे दोन भाग पडल्याने दोन्ही गटांचे सोशल मिडियावरील अकाउंट देखील वेगळे आहेत.
कारवाईमुळे राजकीय वर्तुळाच चर्चा
आज अजित पवार गटाच्या ट्वीटर अकाऊंटवर हे अकाऊंट सस्पेंड केल्याचा मॅसेज पाहायला मिळत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई केल्याचे देखील सांगण्यात आले आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणांमुळे ही कारवाई झाली, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. दुसरीकडे, भाजपसोबत सत्तेत जाऊनही अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई झाल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

राज्यभरात जंगी सभा
दरम्यान, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही खरा पक्ष कोणता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही गट आपलाच पक्ष खरा, असा दावा सागंत आहेत. दोन्ही गटांमधील कायदेशीर लढाई केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. तर, राज्यातही दोन्ही गटांकडून जंगी सभा घेतल्या जात आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्या सभांना उत्सफूर्त प्रतिसादही मिळत आहे. दुसरीकडे, शरद पवार महाराष्ट्रात जेथे कुठे जाहीर सभा घेत आहेत त्या-त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उत्तरदायित्व सभा घेत आहेत.
शरद पवार गटाचा अर्ज
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांची धाकधूक वाढली आहे. अपात्रतेच्या कारवाईसाठी दोन स्वतंत्र अर्ज करण्यात आलेले आहेत.