लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या बैठकांनाही जोर आला आहे. अशात नेत्यांकडून आता मतदारसंघावर दावे सांगण्यास सुरूवात झाली आहे. एकेकाळी भाजपचे दिग्गज नेते असलेले व नंतर देवेंद्र फडणवीसांसोबतच्या संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांनी पक्षाने संधी दिल्यास आपण लोकसभा लढायला तयार आहोत, असे म्हणत एकप्रकारे आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे.
…तर सून विरुद्ध सासरे
पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. विशेष म्हणजे रावेर मतदारसंघातून सध्या खडसे यांची सून रक्षा खडसे या खासदार आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असली तरी त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपमध्येच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने एकनाथ खडसे यांना रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यास 2024मध्ये रावेरमध्ये सून विरुद्ध सासरे अशी लढत बघायला मिळू शकते.
इंडियाच्या बैठकीकडे लक्ष
विरोधी आघाडी I.N.D.I.A ने आज (१३ सप्टेंबर) नवी दिल्लीत समन्वय समितीची पहिली बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. यामध्ये जागावाटप, उमेदवारांची नावे निश्चित करणे आदी मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीच्या पार्श्वभूमीवरच एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळाच चर्चांना चांगलाच उत आला आहे.
काँग्रेसचा सतत पराभव
रावेरमधून लोकसभा लढवण्याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की,काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 1990 पासून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मात्र, काँग्रेसला अद्यापही येथे यश मिळवता आले नाही. काँग्रेसचा येथे सातत्याने पराभव झाला. त्यामुळे ही जागा इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेऊन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करण्यास संधी दिली तर आपण निवडणूक लढायला तयार आहोत. तसेच, इंडिया आघाडीने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील काय म्हणाले होते?
दरम्यान, 5 तारखेला झालेल्या जळगावच्या सभेत जयंत पाटील यांनी खडसेंना लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. जयंत पाटील म्हणाले होते, आता या जिल्ह्यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोण? हा प्रश्न आमच्या सर्वांच्याच मनात आहे. नाथाभाऊ हे शिवधनुष्य तुम्हीच उचलले पाहिजे, असे आम्हा सर्वांना वाटत आहे. तुम्ही 25 ते 30 वर्ष दोन-दोन खासदार निवडून दिलेले आहेत. त्यामुळेच शरद पवारांची अशी अपेक्षा आहे.1985 मध्ये शरद पवारांच्या मागे सातच्या सात आमदार निवडून देऊन 100 टक्के रिझल्ट या जिल्ह्याने दिला आहे. ही या जिल्ह्याची परंपरा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, या जिल्ह्यात लोकसभेचे शिवधनुष्य तुम्ही उचलले पाहिजे.