केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य जनता व गरिबांच्या हिताचे नाही. काँग्रेसचे सरकार असताना रेशनवर गहू, तांदूळ, डाळ, डालडा, तेल, साखर मिळत होते पण भाजपाच्या राज्यात रेशनवर धान्य मिळत नाही. देशात गरीब लोक राहिले नाहीत, असे केंद्र सरकार म्हणत आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, मोदी सरकारने गरीब कुटुंबाला उज्ज्वला गॅस दिला आणि केरोसिन बंद केले. सरकारच्या मते ज्यांच्या घरी गॅस सिलिंडर आहे तो गरीब नाही. या लोकांना रेशनवरील डाळ, तेल, साखर, तांदूळ सर्व बंद करुन टाकले. शेतकऱ्यांच्या शेतात डाळ पिकते त्यावेळी डाळीला भाव नसतो आणि तीच डाळ अदानींच्या गोडाऊनमध्ये गेली की 170 रुपये किलो होते. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत नाना पटोले यांनी आज भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात बोलताना हे वक्तव्य केले आहे.
नेमके काय म्हणाले पटोले?
नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी, व्यापारीविरोधी, गरिबांच्याविरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात डाळ पिकते त्यावेळी डाळीला भाव नसतो आणि तीच डाळ अदानीच्या गोडाऊनमध्ये गेली की170 रुपये किलो होते. दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करा त्यावर आपल्याला जीएसटी द्यावा लागतो. राज्यातील हिटलर सरकार शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही तर कनेक्शन तोडते. उन्हाळी धानाचे पैसे अजून मिळाले नाहीत. आठ दिवसात पैसे देण्याचा नियम आहे पण सरकारने शेतकऱ्यांचा तीन-चार महिने दैसे दिले नाहीत. गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, त्याचा उपयोग काय? खतांच्या किमती दुप्पट केल्या व खतांचे पोते 50 किलोऐवजी 45 किलोचे केले, असे म्हणत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.