हरियाणा पोलिसांनी मोनू मानेसरला अटक केली आहे. भिवानीमध्ये जिवंत जाळलेल्या नसीर-जुनेद हत्याकांडात मोनू मानेसरचा हात असल्याचा आरोप आहे. त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मोनूला त्याच्याच गावातून पकडण्यात आले आहे. गेल्या 8 महिन्यांपासून तो फरार होता.16 फेब्रुवारी 2023 रोजी हरियाणातील भिवानी येथे बोलेरो गाडीत दोन जळालेले मृतदेह सापडले होते. तपासात हे मृतदेह राजस्थानच्या गोपालगड येथील जुनैद आणि नसीर यांचे असल्याचे समोर आले आहे. हरियाणातील अनेक गोरक्षकांवर त्यांच्या हत्येचा आरोप आहे. यातील सर्वात लोकप्रिय नाव मोनू मानेसर उर्फ मोहीत यादवचे होते.
नासीर-जुनैद यांचे एका दिवसापूर्वी झाले होते अपहरण
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घाटमिका गावातील नासीर (28) आणि जुनैद (33) या दोघांचे 15 फेब्रुवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी हरियाणातील भिवानी येथे बोलेरोमध्ये त्यांचा सांगाडा सापडला. या प्रकरणी दोघांच्या कुटुंबीयांनी गोरक्षक मोनू मानेसर आणि बजरंग दलाशी संबंधित त्याच्या साथीदारांवर त्यांना मारहाण करून जिवंत जाळल्याचा आरोप केला होता.त्यानंतर भरतपूर पोलिसांनी मोनू मानेसर आणि इतर लोकांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील 8 फरार आरोपींची छायाचित्रेही पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत.
नसीर-जुनैद हत्याकांडाची कहाणी
भावाच्या सासरच्या घरी परतत होते, मध्येच थांबले
मृत जुनैदचा चुलत भाऊ इस्माईलने आरोप केला होता की, जुनैद आणि नसीर 14 फेब्रुवारीला भोरुबास सिक्री गावात गेले होते. येथे त्याच्या भावाचे सासरचे घर आहे. रात्री तिथेच मुक्काम केला. बुधवारी सकाळी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी घरी येत होते. वाटेत दोघांना बजरंग दलाच्या लोकांनी अडवले. नावे विचारली. यानंतर दोघांनाही गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. नासीर-जुनैद यांना ओढत नेले जात असल्याचे पाहताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी त्यांची बोलेरो कार पळवली.
बोलेरोचा पाठलाग करून दोन्ही बाजूंनी धडक
बोलेरोमध्ये जीव वाचवण्यासाठी जुनेद-नासीर पळताना पाहून त्यांना समोरून मागून धडक दिली, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यानंतर दोघांनाही मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर ते नासीर-जुनैदला फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे बजरंग दलाच्या लोकांनी दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की पोलिसांनी त्यांना ताब्यात देण्यास नकार दिला.
जाळून मृत्यू
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर बजरंग दलाचे नेते मोनू मानेसर, रिंकू सैनी आणि इतर 7 ते 8 जणांनी दोघांनाही भिवानी येथे नेले, असे कुटुंबीयांनी सांगितले. तेथे त्यांना मागच्या सीटवर बसवून बोलेरोसह जीवंत जाळले. या दोघांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर आम्हाला कळले. कारचे इंजिन आणि चेसीस क्रमांकावरून आमचीच कार असल्याचे समोर आले. मरण पावलेले दोघेही आमचे भाऊ होते.