राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेस सामिल झाल्यापासून सर्वच विभागाच बैठकांचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनेक मंत्री नाराज देखील होते. त्या नंतर काही काळ यात खंड पडल्याने सर्व शांत झाले असेही वाटत होते. मात्र, अजित पवार यांनी हे सत्र सुरूच ठेवले आहे. या आधी देखील मुख्यमंत्र्यांडे खाते असलेल्या विभागाचाही अजित पवार यांनी आढावा घेतला होता. त्या वेळी त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. आता यात आणखी भर पडली ती उर्जा विभागाच्या बैठकीची. हे खाते उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तरी देखील अजित पवार यांनी या विभागाची बैठक घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विविध खात्यांच्या बैठकांचा सपाटा लावणाऱ्या अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले खाते देखील सोडले नाही. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर गदा आणत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. इतकेच नाही तर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुममध्येही घुसखोरी केली होती. त्यामुळे शिंदे – फडणवीस आणि पवार सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले हेाते. आता तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याच खात्याची बैठक घेतली आहे. त्यामुळे या राजकीय वातारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याही अधिकारत केला होता हस्तक्षेप
अजित पवार यांनी या आधी भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याही अधिकारात हस्तक्षेप केला होता. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असताना अनेकदा महत्त्वाच्या बैठका घेत अजित पवार यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. चंद्रकांत पाटील यांनी देखील त्याची तक्रार फडणवीस यांच्याकडे केली होती.
आता फडणवीस यांच्या खात्यात हस्तक्षेप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जा विभागाची बैठक घेतली. हे मंत्रालय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यात ऊर्जा विभागाची बैठक अजित पवार यांनी घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीत महावितरणच्या प्रलंबित कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीला अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार, दिलीप मोहिते पाटील, डॉ. किरण लहामटे, संजय शिंदे, देवेंद्र भुयार, दिलीप बनकर आणि चंद्रकांत नवघरे उपस्थित होते. बैठकीला ऊर्जा विभागाचे सचिव आणि एमडीही उपस्थित होते.