• Wed. May 7th, 2025

श्री. नवयुवक व्यापारी गणेश मंडळाचे सामाजिक कार्य मोलाचे : ना. संजय बनसोडे

Byjantaadmin

Sep 11, 2023
श्री. नवयुवक व्यापारी गणेश मंडळाचे सामाजिक कार्य मोलाचे : ना. संजय बनसोडे
मंडळाची कार्यकारिणी घोषित: रामदास जलकोटे अध्यक्ष तर प्रशांत मांगुळकर सचिव
उदगीर : उदगीर शहरातील प्रतिष्ठित असलेल्या श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध  उपक्रमामुळे सामाजिक हित जोपासले जाते. या गणेश मंडळाचे सामाजिक कार्य हे मोलाचे आहे असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व बंदरे मंत्री ना. संजय बनसोडे यांनी केले.
        उदगीर येथील संघर्ष मित्र मंडळ व  श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव 2023 च्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ना. संजय बनसोडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. गोविंद केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष तथा सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष राजेश्वर निटूरे, सहयोग अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, नारायणा ऍग्रो चे संचालक सागर महाजन, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पाटील, चंद्रकांत टेंगेटोल, सय्यद जानी यांची उपस्थिती होती.
      यावेळी बोलताना ना. बनसोडे यांनी श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ हे केवळ गणेशोत्सव पुरते मर्यादित काम न करता वर्षभर विविध उपक्रम राबवून सामाजिक हिताला प्राधान्य देत असते हे उल्लेखनीय असल्याचे सांगत, आगामी काळात जी गणेश मंडळे गेल्या अनेक वर्षांपासून स्थापन केली जात आहेत, त्यांना एकदा परवानगी घेतल्यानंतर पाच वर्षे परवानगी  काढण्याची गरज राहणार नाही असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती दिली. तसेच अनेक गणेश मंडळांकडून उत्कृष्ट देखावे सादर केले जातात पण रात्री दहा वाजेपर्यंत मार्यदित वेळ असल्याने शेवटच्या दिवसात गणेश मंडळांसमोर गर्दी वाढत आहे. त्यामुळे शेवटची चार दिवस देखावे दाखविण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याचा निर्णयही  राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती यावेळी ना. संजय बनसोडे यांनी दिली.
संघर्ष मित्रमंडळ व श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ गेल्या दोन तीन वर्षांपासून सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून गोसेवेचे पुण्याचे काम करीत आहेत, हे काम मोठे असून आगामी काळात या कामाला आणखी चालना मिळावी याकरिता सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेस आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाहीही यावेळी ना. बनसोडे यांनी दिली.
         यावेळी रमेश अंबरखाने, राजेश्वर निटूरे, माजी आ. गोविंद केंद्रे, बस्वराज पाटील नागराळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाची नूतन वर्षांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात प्रमुख मार्गदर्शक: रमेश अंबरखाने, अध्यक्ष म्हणून रामदास जळकोटे, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव प्रशांत मांगुळकर, सहसचिव गोपाळ मुक्कावार, कोषाध्यक्ष विजय मांगुळकर, सहकोषाध्यक्ष नरसिंग कंदले आदींसह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाचे सर्व सदस्य, नागरिक उपस्थित होते.
        या बैठकीचे प्रास्ताविक नरसिंग कंदले यांनी केले. सुत्रसंचलन श्रीपाद सिमंतकर यांनी केले. आभार मोतीलाल डोईजोडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *