जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण देण्याची तयारी दाखवली आहे. या संदर्भात आंदोलनकर्ते आणि राज्य सरकार यांच्यात अद्याप एकमत झाले नसले तरी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देता तर मग, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले आहे का? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतला असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
राज्यात सध्या काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या निमित्त पृथ्वीराज चव्हाण सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान ते माध्यमाशी बोलत होते. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. असे असताना भाजप मराठा समाजाला सरसकट आरक्षण का देत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पृथ्वीराज चव्हाण देखील दिल्लीतून आले मग त्यांनी का आरक्षण दिले नाही, या अजित पवार यांनी केलेल्या टिकेला देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.
शाहू महाराजांचे दाखले ग्राह्य का धरत नाही?
अजित पवारांना पक्षांतरामुळे विसर पडलेला दिसतोय की, मी मुख्यमंत्री असताना आपण सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्यावेळी ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते अशी आठवण पृथ्वीराज चव्हाण यांनी करुन दिली आहे. ज्यांच्याकडे निजामकालीन कागदपत्र, दाखले पुरावे आहेत त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचे आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, असे गरीब मराठा समाजाला आरक्षण नाही. अशा पध्दतीने आता मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग सरकारने केले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. सरकार निजामकालीन कागदपत्रे आणि पुरावे दाखले ग्राह्य धरत आहे. असे असेल तर आपण शाहू महाराजांचे दाखले ग्राह्य का धरत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
फडणीस यांनी दिलेले आरक्षण फसवणूक करणारे
2018 साली देवेंद्र फडणीस यांनी जे आरक्षण दिले ते फसवणूक करणारे आरक्षण होते, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या आधीच दिल्लीने राज्यघटनेमध्ये 102 वी घटनादुरुस्ती केली होती आणि त्यामुळे मागासवर्गीय समाजाला आरक्षण देण्याचे सर्व अधिकार हे राष्ट्रपतीने स्वतःच्या हातात घेतले होते, असेही चव्हाण म्हणाले. वास्तविक राज्य सरकारकडे कुठलाही अधिकार राहिला नव्हता आणि त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा कायदा झाला ही निव्वळ फसवणूक होती असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.