महाराष्ट्र महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा व प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग व प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन उद्या सकाळी ठिक १०:०० वाजता होणार असून सलग एक आठवडा प्रशिक्षण चालणार आहे.
मोडी लिपी ही सध्या व्यवहारात नसली तरी गतकाळातील अनेक दस्ताऐवज, कागदपत्रे मोडी लिपीमध्येच आहेत. मोडी लिपी ही गतकालीन संस्कृती, राजकीय-शासकीय व्यवहार समजावून घेण्यासाठी महत्वाची आहे. एवढेच नव्हे तर शिवकाळापासून ते स्वातंत्र्यापर्यंतचे अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे मोडी लिपीमध्येच आहेत. मात्र मोडी लिपीच्या जाणकारांची संख्या ही अत्यल्प आहे. त्यामुळे या प्रशिक्षण कार्यशाळेचे विशेष महत्व आहे. निलंगा परिसरातील विद्यार्थी, इतिहास व मोडी लिपीचे जाणकार, अभ्यासक या सर्वांना या कार्यशाळेत प्रवेश घेता येईल. कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. तरी विद्यार्थी, जाणकार व अभ्यासुंनी या कार्यशाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एम.एन.कोलपूके, संयोजक डॉ. एस.जी.बेंजलवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.