घंटा वाजली नाही, शाळा-महाविद्यालयांसह ट्यूशन परिसरात शुकशुकाट
लातूर, प्रतिनिधी मराठा समाजास सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि.९) पुकारण्यात आलेल्या बंदला शहर व जिल्हाभऱात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळांची घंटा वाजली नाही. महाविद्यालये व शिकवणी वर्गातही शुकशुकाट दिसून आला.
या बंदबाबत शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच शिकवणी वर्ग संचालकांची मराठा क्रांतीच्या समन्वयकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या बंदबाबत विनंतीपत्र देऊन अवगत केले होते. समाजासाठी आरक्षणाचा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा व जीवन मरणाचा बनला असून या पार्श्वभूमिवर बंदसाठी आपण सहकार्य करावे अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यार्थी वाहतुक संघटनांनाही असा आर्जव करण्यात आला होता. सर्वांनीच या विनंतीचा आदर करीत आपापली शाळा महाविद्यालये बंद ठेवली यामुळे बंदसाठी वेगळ्या प्रयत्नांची कसलीच गरज भासली नाही. अनेक शाळांनी विद्यार्थी व पालकांना शाळा बंद राहणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. या बंदबाबात समाजमाध्यमांवरुन मोठ्या प्रमाणात संदेश झळकवण्यात आले होते. विद्यार्थी वाहतूक संघटनांनीही वाहने रस्त्यांवर आणली नाहीत. सर्वच शाळां- महाविद्यालयांनी शुकशुकाट दिसून आला. एरवी विद्यार्थ्यांनी गजबजलेला ट्यूशन परिसर निर्मनुष्य होता. असाच माहोल सर्व शैक्षणिक संस्थात दिसत होता. एकंदरीत योग्य नियोजन व विनम्रता केंद्रस्थानी ठेऊन करण्यात आलेले हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. केलेल्या सहकार्याबद्दल मराठा क्रांतीच्या वतीने सर्व शिक्षणसंस्था, शिकवणी वर्ग संचालक, विद्यार्थी वाहतुक संघटना विद्यार्थी व पालकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.