• Fri. May 2nd, 2025

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परीसरात सर्व प्रकारचे वैद्यकीय शिक्षण मिळणारे हब निर्माण करण्याचे प्रयत्न-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

Byjantaadmin

Sep 8, 2023

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परीसरात सर्व प्रकारचे वैद्यकीय शिक्षण मिळणारे हब निर्माण करण्याचे प्रयत्न-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

 

 

लातूर (प्रतिनिधी) ८ सप्टेंबर २०२३ : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल त्वरीत सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. येथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे वैद्यकीय शिक्षण मिळणारे हब निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना करून त्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली. माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार
दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कार्याचा व विविध विकासकामांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. बैठकीच्या प्रारंभी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी महाविदयालयात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहीती दिली. महाविदयालयातील शैक्षणिक सुधारणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी तसेच रूग्णावर उपचार करण्यासाठी उभारावयाच्या सोयीसुवीधांच्या माहीतीचे त्यांनी यावेळी सादरीकरण केले.

डॉ. उदय मोहिते यांनी या महाविदयालयाच्या उभारणी संबंधी पार्श्वभुमी विशद केली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जो उददेश ठेऊन हे महाविदयालय सुरू केले तो उददेश आता साध्य होत असल्याचे त्यांनी म्हटले.  आमदार अमित विलासराव देशमुख वैदयकीय शिक्षण मंत्री असतांना लातूर येथील वैदयकीय महाविदयालयात २५० ते ३०० कोटी रूपय खर्चाचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यांची कामे सदया प्रगतीपथावर आहेत. त्यांच्या पाठपूरावातून आणखी २५० कोटीचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यांचीही कामे लवकरच सुरू होतील.

महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. जोशी यांनी महाविदयालया संबंधी सादरीकरण केल्यानंतर बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, अल्पावधीत हे वैद्यकीय महाविद्यालय नावारूपाला आणण्यासाठी येथील सर्वच घटकांनी मोठे योगदान दिले आहे. आगामी काळात लातूरच्या शैक्षणिक परंपरेला शोभेल असे वैदयकीय शिक्षणाचे संकूल उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वैदयकीय महाविदयालयाच्या परीसरातच ॲलोपॅथी बरोबर आयुर्वेदीक, होमीयोपॅथी, नॅचरोपॅथी, युनानी यासह नर्सीग व पॅरामेडीकलचे शिक्षण देणारी सर्व महाविदयालय सुरू करण्याच्यादृष्टीने पस्ताव तयार करावा त्यासाठी लागणाऱ्या अतरिीक्त जागेची मागणीही नोंदवावी. या मागण्या मंजूर होणेसाठी सातत्याने पाठपूरावा केला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. विलासराव देशमुख वैदयकीय महाविदयालयाला संलग्न असलेल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल त्वरित सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. रुग्णालयात अत्यावश्यक असणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा, रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नयेत. महाविद्यालय व रुग्णालय परिसरात अवयव प्रत्यारोपण विभाग सुरू करावा. महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही, अग्निसुरक्षा व इतर महत्त्वाच्या
यंत्रणा त्वरित उभाराव्यात. दर्जेदार शिक्षण, आणि तातडीच्या रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष द्यावे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डायलिसिस मशीनची सेवेसंबंधी महत्त्वाच्या असलेली एमआरआय, सिटीस्कॅन व इतर उपकरणे सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भाने मंजूर असलेली तीनशे ते चारशे कोटी रुपयांची बांधकामे सध्या सुरू आहे संबंधित विभागाने ती दर्जेदार पद्धतीने पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. महाविद्यालय परिसरात स्वच्छता राहील येथील, सांडपाण्याचा निचरा होईल याची लातूर महापालिकेने काळजी घ्यावी. महाविद्यालय परिसरातील वस्तीगृहात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात त्याचबरोबर तात्पुरते क्रीडांगण उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करावी, यासह आवश्यक त्या सूचना आमदार अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या. वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणारे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासनही या बैठकीदरम्यान राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले.

या बैकीस डॉ. उमेश कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उपअभियंता दत्तात्रय इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढेले, वैद्यकीय अधीक्षक सचिन जाधव, डॉ. वडगावे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन रवींद्र काळे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले, फारुख शेख, भारत बनसोडे, रमेश
कांबळे, गणेश एसआर देशमुख, अकबर माडजे आदीसह विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अभ्यागत मंडळाचे माजी सदस्य, अधिकारी, कर्मचारी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरानी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तेथील सोयी-सुविधा तसेच नवीन प्रकल्प उभारणीसंबंधी आढावा बैठक घेतली, येथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे वैद्यकीय शिक्षण मिळणारे हब निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा अशी सूचना करून त्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

 

लोकनेते विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयच्या दक्षिण भागात लोकनेते विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारावा अशी मागणी लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी या बैठकीत केली.

 

महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर असोसिएशन लातूरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे यांनी यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना आमदार अमित देशमुख यांनी जे महत्वाचे निर्णय घेतले त्यामुळे महाराष्ट्रातीलल सर्वच वैदयकीय महाविदयालयातील प्राध्यापकांची पदे भरली गेली आहेत. त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैदयकीय अधिकारी तसेच इतर आवश्यक असलेल्या कर्मचारी भरती सदया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. वैदयकीय शिक्षण मंत्री असतांना आमदार अमित देशमुख यांनी महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर असोसिएशनचे विविध प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांचे संघटनेच्या वतीने डॉ. कानडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *