केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभा विसर्जित करून मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. लोकसभा विसर्जित करताना लोकसभेच्या सदस्यांचा ग्रुप फोटो काढला जातो. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने हा फोटो काढण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे कदाचित आगामी अधिवेशन 17 व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन ठरू शकते, असे ते म्हणालेत.नरेंद्र मोदी सरकारने येत्या 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशन नेमक्या कोणत्या कारणांसाठी बोलावण्यात आले आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका व्हिडिओद्वारे या अधिवेशनात मोदी सरकार लोकसभा विसर्जित करणार असल्याचा दावा करून मोठी खळबळ उडवून दिली आहे.
ग्रुप फोटो काढण्याची तयारी पूर्ण
खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक देश, एक निवडणूक प्रकरणी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 व्या लोकसभेला विसर्जित करण्याच्या विचारात असल्याचा दावा केला आहे. लोकसभा विसर्जित केली जाते तेव्हा त्या लोकसभेच्या सर्व सदस्यांचा एक ग्रुप फोटो काढला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, हा ग्रुप फोटो काढण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे कदाचित हे विशेष अधिवेशन 17 व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन ठरू शकते. मोदी सरकार लोकसभा विसर्जित करून मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जावू शकते, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारचा निर्णय झाला
या दाव्याच्या पुष्टीसाठी अमोल कोल्हे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी एका समितीच्या सदस्यत्वाला दिलेल्या नकाराचाही दाखला दिला आहे. अधीर रंजन चौधरी यांनी एक देश एक निवडणुकीची व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका समितीच्या सदस्यत्वाला नकार दिला आहे. ही समिती व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी स्थापन झाली आहे. पण तिच्या अटी पाहता तिचा उद्देश सरकारचा हेतू साध्य करण्याचाच असल्याचे सिद्ध होते. अर्थात एक देश एक निवडणूक राबवण्याचा मोदी सरकारचा निर्णय झाला आहे, असेही कोल्हे आपल्या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहेत.
एक देश, एक निवडणूक ईव्हीएमवर की बॅलेट पेपरवर?
देशात ईव्हीएमविषयी संशय व्यक्त केला जात आहे. असे असताना एक देश, एक निवडणूक ईव्हीएमवर होणार की बॅलेट पेपरवर? निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता जपायची असेल, तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचे धाडस मोदी सरकार दाखवणार का? नाही तर निवडणुकीची विश्वासार्हता राखली जाणार का? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न अमोल कोल्हे यांनी आपल्या व्हिडिओद्वारे उपस्थित केलेत.