मराठा आंदोलनासाठी एकीकडे 11 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठींबा मिळत असून राज्यात जागोजागी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. अशातच बीड मधील वासनवाडी या गावात चार महिलांनी स्वत:ला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेत आंदोलन केले आहे.
सरकारविरोधात घोषणाबाजी
वासनवाडी या गावातील या चार महिलांनी मराठा आरक्षणासाठी स्वत:ला जमिनीत गाडून घेतले होते. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा, आरक्षण दिलेच पाहिजे, जय शिवराय, कोण आल्या रे कोण आल्या कोण आल्या महाराष्ट्राच्या वाघिणी आल्या, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा या महिलांनी दिल्या. तसेच यावेळी त्यांनी आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे’ अशी मागणी देखील केली. या आंदोलनाची माहिती अधिकाऱ्यापर्यंत पोहचल्यानंतर गावातील प्रशासकीय अधिकारी आंदोलनस्थळी आले होते.
अजून किती बळी घेणार
आंदोलन करणाऱ्या महिला म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची एकच विनंती आहे. मनोज जरांगे पाटील 11 दिवस झाले आंदोलन करीत आहे त्यांची सरकारकडून दखल घेतली जात नाही. आम्ही त्यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करीत आहोत. आम्ही शांततेच्या मार्गाने 53 मोर्चे काढले. आमच्या अनेक बांधवांवर केसेस झाल्या आम्ही इतक्या पावसात हे आंदोलन करत आहोत कारण आमची एकच मागणी आहे ती म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाण्पत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तुम्ही जर हे करणार नसताल तर राजीनामा देत मला मुख्यमंत्री करावे, मी मराठा समाजाला आरक्षण देईल असे आंदोलनकर्त्या महिलेने म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार अजून किती बळी घेणार. असे म्हणत दिवगंत विनायक मेटे यांच्या मृत्यूवर वक्तव्य केले आहे. दरम्यान करुणा मुंडे शर्मा यांनी या आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेतली असून त्यांनी आपले उपोषण सोडावे अशी विनंती केली आहे.