• Fri. May 2nd, 2025

आयपीएस रश्मी शुक्ला यांना दिलासा:फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे हायकोर्टाकडून रद्द

Byjantaadmin

Sep 8, 2023

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हे फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत होत्या. त्यांना दिलासा मिळाला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात थेट वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव घेतले गेले होते. या प्रकरणी दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता हे प्रकरण संपणार असल्याची शक्यता आहे.

 

दरम्यान या प्रकरणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलिसांच्या बदलीमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार उघड केला होता. या संदर्भात तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना लिहिलेले पत्र त्यांनी उघड केले होते. तसंच याप्रकरणातील पेन ड्राईव्ह देखील समोर आणला होता.

काय आहे प्रकरण?

रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात, तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मुंबई हायकोर्टाकडून क्लिनचिट

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्याने विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना हे दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पुण्यातील प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, कुलाबा प्रकरणात शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारने मंजुरी देण्यास नकार दिला होता. आता मुंबई हायकोर्टाकडून त्यांना या प्रकरणी क्लिनचिट मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *