सरकारकडे पक्ष फोडायला पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही, अशी जहरी टीका शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी केली. ते शिर्डीमध्ये बोलत होते. ठाकरे यांनी आज काही दुष्काळी भागाची पाहणी केली. शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले.सध्याचे सरकार निर्दयी आणि निर्घृण आहे. शेकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि तो मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून नुकसानीची पाहणी करावी. दुबार पेरणीनंतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कारभार शून्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार लवकरात लवकर जावो, अशी मी साईचरणी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकार मारते थापा
सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली. हे सरकार निर्दयी असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारमधील मंत्र्यांना काम करता येत नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकरी 50,000 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी शेतकरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
दुष्काळसदृश परिस्थिती असताना पालकमंत्री मात्र अदृश्य आहेत, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. जी पिके करपून गेली आहे, पीकांमध्ये आता दाने भरली जाणार नाही, असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिंदेंवर जोरदार हल्लाबोल
उद्धव ठाकरे म्हणाले की, दुष्काळ उंबरठ्यावर असताना जुनी नुकसान भरपाई कधी मिळेल. एक रुपया वीमा म्हणतात. पण, अर्ज भरण्यासाठी किती रुपये जातात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून विमा भरतो. राज्य सरकार शेतकऱ्यांचा विमा भरतो. 1 रुपयात पीकविमा ही जी योजना आणली आहे. त्यांचे पंचनामे कधी होणार असून ते पैसै शेतकऱ्यांना कधी मिळणार आहेत, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पावसात भिजत आज दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.