• Fri. May 2nd, 2025

महाराष्ट्र भाजपत दुही?:मुंबईत महत्त्वाची बैठक, पण सुधीर मुनगंटीवारांना निमंत्रण नाही

Byjantaadmin

Sep 8, 2023

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आता भाजपचे बडे नेते सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. यामुळे भाजपमध्येही दुही माजली की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.गत काही महिन्यांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाने त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाची जबाबदारी टाकली. यामुळे भाजपत धुसफूस असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांना एका महत्त्वाच्या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची बातमी बाहेर आली आहे.

 

यासंबंधीच्या वृत्तानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबईत विभागवार बैठका सुरू आहेत. सकाळी 9 पासून या बैठकांचा धडाका सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी प्रत्येक आमदारांशी चर्चा करत त्यांच्या विभागाची माहिती घेत आहेत. पण या बैठकीपासून सुधीर मुनगंटीवार यांना दूर ठेवण्यात आले आहे. मुनगंटीवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्याला या बैठकीचे निमंत्रण नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.

शिंदे – पवारांसोबतची भाजप आवडत नाही

उल्लेखनीय बाब म्हणजे मुनगंटीवर यांनी नुकतेच आपल्याला एकनाथ शिंदे व अजित पवारांसोबतची ​​​​​​​भाजपा आवडत नसल्याचे विधान केले होते. मला शिंदेंसोबतची भाजपा आवडत नाही आणि अजित पवारांसोबतचीही भाजपा आवडत नाही. मला भाजपा हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडतो. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात आता उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता त्यांना भाजपने महत्त्वाच्या बैठकीपासून दूर ठेवल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

कोण आहेत सुधीर मुनगंटीवार?

सुधीर मुनंगटीवार यांनी 1995 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात ते 55 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर चंद्रपूर मतदारसंघातून 6 वेळा ते विधानसभेवर पोहोचले. सेना-भाजपच्या युती सरकारमध्ये ते पर्यटन व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री होते. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेले गोंडवन विद्यापीठ उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2009 ते 2013 दरम्यान त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले होते.सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्त्वातील सरकारमध्ये (2014-19) अर्थ आणि नियोजन व वन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले आहे. सध्याही शिंदे सरकारमध्येही त्यांच्याकडे वन, सांस्कृतिक प्रकरणे व मत्स पालन विभागाची जबाबदारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *