• Thu. May 1st, 2025

” आठ महिने मुख्यमंत्री कार्यालयातला ‘डमी ओएसडी’ कळत नसेल, तर..”

Byjantaadmin

Sep 8, 2023

अचलपूर नगरपालिकेतील तृतीयश्रेणी कर्मचारी मयूर ठाकरे हा गेल्या आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वावरत आहे. त्यापलीकडे सह्याद्री, वर्षा आणि नंदनवन या बंगल्यावरही त्याचा राबता होता. या ठिकाणी असलेली नेत्यांची वर्दळ आणि त्यांच्याकडच्या कामांचे स्वरूप हेरून मयूरने मुख्यमंत्र्यांचा ‘ओएसडी’असल्याचे भासवले.’सरकारनामा’ने या धक्कादायक प्रकाराची पोलखोल केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तसेच दिवसभर या धक्कादायक प्रकारावर विरोधी पक्षांकडून सरकारला कोंडीत पकडण्याची आयतीच संधी मिळाली आहे. याच प्रकारावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना  ना खोचक टोला लगावला आहे.

Eknath Shinde

‘सीएमओ’तील बोगस ‘ओएसडी’वरून विरोधकांच्या हल्लेबोलला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार कर्जत-जामखेड रोहित पवार यांनी आज सुरुवात केली. एक डमी ओएसडी (OSD) मुख्यमंत्री कार्यालयात बसून बोगस कारभार चालवतो, अनेक महत्त्वाच्या बैठका घेतो, वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देतो. ही गोष्ट मुख्यमंत्री कार्यालयाला तब्बल आठ महिने जर कळत नसेल तर जनतेचे प्रश्न कसे कळतील,असा हल्लाबोल त्यांनी केला.एकीकडे युवक सीरियस नाहीत,असे सरकार म्हणते. मात्र, या प्रकरणावरून सरकारच राज्यातील प्रश्नांच्या बाबतीत सीरियस नाही हेच दिसत आहे अशी तोफ आमदार रोहित पवार यांनी डागली आहे.अचलपूर (जि.अमरावती) नगरपालिकेतील तृतीय श्रेणी कर्मचारी मयूर ठाकरे याने महाराष्ट्राच्या ‘सीएमओ’ कार्यालयात ‘डमी ओसडी’ म्हणजे चक्क तोतया आयएएस अधिकारी बनून आठ महिने कारभार हाकलल्याचे खळबळजनक प्रकरण मंगळवारी (ता.५) उजेडात आले आहे. त्यामुळे राज्यभर व त्यातही मंत्रालयात मोठी खळबळ उडाली आहे.

आधीच अडणीत आलेल्या राज्य सरकारची पुन्हा कोंडी..?

मराठा आरक्षण आंदोलकांवर बेछूट पोलीस लाठीमारामुळे आधीच अडणीत आलेल्या राज्य सरकारची या प्रकारामुळे आणखी कोंडी झाली आहे. कारण यातून आणखी एक मुद्दा विरोधी पक्षांच्या आयताच हाती लागला आहे.त्यावरून ते राज्य सरकार व त्यातील तिन्ही पक्षांना कोंडीत पकडण्याची आलेली संधी सोडणार नाहीत. उद्याच्या `सामना`त या प्रकरणावरून राज्य सरकार व मुख्यमंत्र्यावर जोरदार शरसंधान होईल,असा अंदाज आहे. या बोगसगिरीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी आता पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *