अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेतील तृतीय श्रेणी कर्मचारी मयूर ठाकरे याने थेट महाराष्ट्राच्या ‘सीएमओ’ कार्यालयात ‘डमी ओएसडी’ अधिकारी बनून आठ महिने कारभार हाकलल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले. त्यामुळे मंत्रालयासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. यातच आता मयूर ठाकरेचे नवनवे प्रताप उघडकीस येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासगी ‘ओएसडी’ आहे, असे भासवून तब्बल आठ महिने मंत्रालयात मुक्तसंचार करणाऱ्या मयूर ठाकरेच्या नवनवीन धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत. मुख्यमंत्र्यांचा ‘ओएसडी’ आहे असे मिरवत पोलीस अधिकाऱ्यांपासून ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवरच नियंत्रण ठेवण्याचा प्रताप करणाऱ्या मयूर ठाकरेचे आता आणखी एक बिंग फुटले आहे. ठाकरे हा चक्क मुख्यमंत्र्यांच्या ‘बुलेटप्रूफ’ कारमधून फिरत होता अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मयूर ठाकरे हा तोतया ‘ओएसडी’ चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ कार वापरायचा. पोलिसांवर, अधिकाऱ्यांवर रूबाब करायचा, अरेरावीची भाषा करायचा. मुख्यमंत्री शिंदे यांचा खासगी ‘ओएसडी’ असल्याचा आव आणत शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या यंत्रणेला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न मयूर ठाकरेकडून होत असे. त्यामुळे त्याचे अनेक नेते आणि अधिकाऱ्यांशी संबंध आले. यातून त्याने आपल्या पदरात ‘खूप काही’ पाडून घेतल्याचेही बोलले जाते.
…पण सरकारची भूमिका काय?
मयूर ठाकरे याचे आता निरनिराळे उद्योग पुढे येऊ लागले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांसोबतच सनदी अधिकाऱ्यांनाही गंडा घालण्याचा प्रकार मयूरने केले असल्याचे बोलले जाते. काही सनदी अधिकाऱ्यांकडून त्याने लाखो रुपये उकळले असल्याचीही चर्चा खासगीत केली जाते. सामान्य माणसांना जिथे प्रवेश मिळणे शक्य नसते तिथे मयूर ठाकरे हा चक्क तोतया ओएसडी म्हणून वावरतो, प्रशासकीय यंत्रणेला मुठीत ठेवतो, गैरप्रकार करतो आणि हा उपदव्याप तब्बल 8 महिने चालतो याचेच आश्चर्य आता सर्वांना वाटत आहेयाही पुढे जाऊन त्याने मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज हातात घेतल्याची चर्चा होती. मयूरने असे एक ना अनेक प्रताप करूनही या प्रकरणावरून त्याला धडा शिकवण्याची भूमिका अजूनही सरकारने घेतलेली नाही, यामागे नेमके काय काळेबेरे आहे ? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.