• Thu. May 1st, 2025

टोईंग वाहनावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण; गुन्हा दाखल

Byjantaadmin

Sep 7, 2023

टोईंग वाहनावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण; गुन्हा दाखल

वाहतुकीचे नियम पाळण्याचे मनपाचे आवाहन

   लातूर/प्रतिनिधी:टोइंग वाहनावरील महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील नागरिकांनी असे प्रकार टाळावेत.वाहतुकीचे नियम पाळावेत,असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

     लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विश्व एंटरप्राइजेस यांना वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने काम देण्यात आलेले आहे.नो पार्किंग झोनमध्ये उभ्या वाहनांना जामर लावणे,दंड वसूल करणे अशी कामे ही एजन्सी करते.बुधवारी (दि.६ सप्टेंबर) सायंकाळी सुभाष चौकात एका व्यक्तीने नो पार्किंग झोन मध्ये दुचाकी लावली. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी या दुचाकीस जामर लावले.त्यावेळी संबंधित अनोळखी व्यक्ती व दोन महिलांनी एजन्सीच्या कर्मचारी बालिका कांबळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तसेच मारहाणही केली.यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.कांबळे यांनी यासंदर्भात गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून अनोळखी व्यक्तींच्या विरोधात IPC कलम 325, 294, 323, 504, 509 व 34 नुसार गुन्हा आला आहे.

    शहरातील वाहतूक सुरळीत करून नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी मनपा व वाहतूक पोलिसांच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत.नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

    वेगाने विकसित होणाऱ्या लातूर शहरात वाहनांची संख्या मोठी आहे.वाहनधारक सार्वजनिक ठिकाणी व बाजारपेठेत आल्यानंतर पार्किंगची समस्या निर्माण होते.त्यावर तोडगा काढण्यासाठी मनपाने पार्किंगसाठी ठिकाणे निश्चित केली आहेत. नागरिकांनी तेथेच आपली वाहने पार्क करावीत. वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी मुख्य रस्त्यावर पिवळे पट्टे मारण्यात आले आहेत.या पिवळ्या पट्ट्याच्या आतील बाजूस नागरिकांनी वाहन सोडणे आवश्यक आहे.पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर वाहन सोडून वाहतुकीस अडथळा केला तर संबंधित वाहनास जामर लावून दंड आकारला जातो.नागरिकांनी आपली वाहने ठरवून दिलेल्या ठिकाणी,पिवळ्या पट्ट्याच्या आतील बाजूसच पार्क करावीत. वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी आपली वाहने उभी करू नयेत.सध्या सणासुदीचे दिवस आहेत.त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी आहे.अशा स्थितीत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.दंडात्मक कारवाई होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *