लातूर : डोक्यावर चार लाखांचं खासगी कर्ज, अर्धा एकर शेती त्यात पावसाने दिलेला दगा करायचं काय या चिंतेत असलेले शेतकरी गोपाळ भोजने यांच्या डोळ्यासमोर सोयाबीनचे पीक वाळत होतं. हातातोंडाशी आलेलं पीक जगावायच्या प्रयत्नात विजेचा धक्का बसल्यानं भोजने यांनी जीव गमावला. फ्यूज टाकताना त्यांना विजेचा धक्का लागला अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला. पत्नी तीन मुलं अन् आई असं त्यांचं कुटुंब उघड्यावर आलं आहे. ही घटना औसा तालुक्यातील कवळी हिप्परगा इथं घडलीय.शेतीवर घरखर्च भागत नसल्याने भोजने दांपत्य इतरांच्या शेतावर मजुरी करायचे. मात्र दोघांच्या मजुरीवर भागणार किती यामुळं थोडे थोडे करून त्यांच्या डोक्यावर 4 लाखांचं खासगी कर्ज झालं. त्यात यंदा पावसा अभावी वाळत असलेलं सोयाबीन पाहून त्यांचा जीव कासावीस व्हायचा. बोअरला असलेलं पाणी देऊन कसं तरी पीक वाचवावं या विचाराने ते शेतात गेले. लाईट नाही तोपर्यंत डिपीच गेलेलं फ्यूज टाकावं म्हणून ते डिपीला हात लावायला गेले अन् तेवढ्यात वीज पुरवठा झाला. विजेचा धक्का लागताच ते जोरात किंचाळले अन् शांत झाले. हा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी धावत आल्या समोरचे दृश्य पाहून त्यांनी आरडाओरडा केला पण सारं संपलं होतं.गोपाळ भोजने यांच्या मुलालाही यापूर्वी विजेचा धक्का बसला होता. पण त्यातून तो बचावला. मात्र, गोपाळ भोजने त्या धक्क्यातून वाचू शकले नाहीत. याच दुःख त्यांच्या मुलाच्या मनात कायम दाटून राहील.
एकतर डोक्यावर कर्ज त्यात पाऊस नाही त्यामुळं कसं तरी बोअरचं पाणी द्यायला गेलेल्या भावाचा महावितरणच्या निष्काळजीपणामुळे जीव गेला, आता उघड्यावर आलेल्या कुटुंबाला सरकारने काही तरी मदत करावी अशी मागणी त्यांचे भाऊ विश्वनाथ भोजने यांनी केली आहे.दुष्काळाचं सावट असताना विजेच्या धक्क्याने उघड्यावर आलेल्या या कुटुंबाला सरकार मदत करेल का प्रश्न उपस्थित होत आहेच. पण, माणुसकी जिवंत ठेवणारे हात मदतीसाठी सरसावले पाहिजेत तरच या कुटुंबाला आधार मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे