• Thu. May 1st, 2025

महाडिक गटाला मोठा धक्का: राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, सतेज पाटलांच्या बाजूने निकाल

Byjantaadmin

Sep 7, 2023

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र असल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिला आहे. याप्रकरणी आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. कागदपत्रांची तपासणी करून सभासद अपात्र असल्याचा निर्णय दिल्याने सत्ताधारी महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे याबाबत अधिक माहिती देताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, महाडिक गटाने बनावट कागदपत्राच्या आधारे सभासद वाढवले होते. हे सभासद अपात्र करावेत म्हणून दोन वर्षांपूर्वी प्रादेशिक सहसंचालकाकडे दाद मागितली होती. त्यानुसार त्यांनी १३४६ सभासद अपात्र केले. हाच निर्णय सहकार मंत्र्यांनी व नंतर उच्च न्यायालयानेदेखील तो निर्णय कायम ठेवला. मात्र याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा तपासणीसाठी प्रादेशिक सहसंचालकाकडे पाठवले. सहसंचालकांनी दोन महिने प्रत्येक सभासदांची माहिती घेऊन त्यातील बाराशे ७२ सभासदांना अपात्र ठरवले आहे.

amal mahadik satej patil

 

आमदार पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीत आम्हाला सत्ताधारी महाडिक गटाच्या बरोबरीने मते मिळाली. जिंकण्यासाठी किरकोळ मते कमी पडली. हा निर्णय पूर्वी झाला असता तर आमचा विजय निश्चित होता. बेकायदेशीरपणे सभासद वाढवून महाडिक गटाने निवडणूक जिंकली आहे. पण आता सत्याचा विजय झाला आहे. हा कारखाना खऱ्या सभासदांचा मालकीचा व्हावा यासाठी आमचा लढा सुरू आहे, तो यापुढेही सुरू राहील.अपात्र सभासदांच्या मतावरच महाडिक गटाने कारखान्याची निवडणूक जिंकली. त्यामुळे फेर मतदान व्हावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी सांगितले की, अपात्र सभासदांचा फटका निवडणुकीत आम्हाला बसला. याच सभासदांच्या जोरावर हा कारखाना हडप करण्याचा महाडिक गटाचा डाव आहे. त्यामुळे आम्ही आता फेर निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणार आहोत. अपात्र ठरलेल्या सभासदांमध्ये शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील दहा व्यक्तींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मोहन सालपे उपस्थित होते.
गुरुबाळ माळी यांच्याविषयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *