दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे : खा.सुप्रिया सुळे
लातूर : राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती , मराठा आरक्षणासह महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने तात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांनी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या खा. सुप्रियाताईल सुळे गुरुवारी सकाळी लातूर दौऱ्यावर आल्या होत्या. आपल्या या दौऱ्यात त्यांनी लातूरच्या पत्रकारांशी सुसंवाद साधला. पावसाने दडी मारल्याने आजघडीला राज्याच्या कानाकोपऱ्यात दुष्काळाचे भीषण सावट आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करणे गरजेचे आहे. राज्याच्या अनेक भागात ऐन पावसाळ्याच्या दिवसात टँकर सुरु करण्याइतपत पाणी टंचाई आहे. या तसेच मराठा आरक्षणामुळे उदभवलेल्या पेचावर विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाच्या कारणावरून जालना जिल्ह्यात घडलेली आंदोलकांवरील लाठीमाराची घटना अतिशय निंदनीय आहे. त्या लाठीमाराच्या घटनेची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. एकंदर परिस्थितीवरून राज्यातील कोणतेही काम धोरणात्मकदृष्ट्या राबवित नाही. त्यामुळे या सरकारला धोरण पक्षाघात झाल्याचा घणाघाती आरोपही खा. सुळे यांनी केला.
राज्यावर यावर्षी पावसाची अवकृपा झाल्याने पाणीटंचाई सोबतच जमिनीतील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब सुद्धा अतिशय चिंतनिय आहे, असे सांगून खा. सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या की, राज्य सरकार नको त्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. शासन आपल्या दारी या उपक्रमाऐवजी आइस अर्थात इन्कम टॅक्स, सीबीआय, इडी आल्या दारी हा प्रकार अधिक गतीने राबविला जात आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मराठा आरक्षणासोबतच अनेक वर्षांपासूनची आरक्षणाची मागणी असणाऱ्या धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजालाही राज्य सरकारने आरक्षण द्यायला हवे असे त्या म्हणाल्या. केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा कोणताही अजेंडा दिलेला नाही. या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यात आलेला नाही. त्यावरून एकंदर केंद्र सरकारची भूमिकाही दडपशाहीची असल्याचे दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या. विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन आपल्या आघाडीचे नाव इंडिया ठेवल्याने केंद्र सरकार इंडियाचे नामकरण भारत करत असल्याचा आरोपही सुळे यांनी केला.
याप्रसंगी आ.संदीप क्षिरसागर, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, बस्वराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय शेटे, लातूर जिल्हा निरिक्षक डॉ.नरेंद्र काळे, बबन गिते, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख,चंदन पाटील नागराळकर,प्रशांत घार , भरत सुर्यवंशी, डी.उमाकांत, सोमेश्वर कदम, बक्तावर बागवान, निशांत वाघमारे,रेखाताई कदम, मनिषा कोकणे,इर्शाद तांबोळी,छायाताई चिंदे,चंद्रशेखर कत्ते,आदर्श उपाध्ये, गंगापुरे ,मुन्ना तळेकर,विशाल देवकते,विनायक बगदुरे,समीर शेख,प्रदीप पाटील,जाकीर तांबोळी,मदन आबा काळे,परमेश्वर पवार,प्रा.सुधीर साळूंके, डॉ.बापुसाहेब पाटील, कल्याणराव बरगे,रशीद शेख, आत्माराम साळूंके,नरेंद्र पाटील, शिवाजी मुळे,निखिल मोरे,प्रविण साळूंके,खंडू लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे : खा.सुप्रिया सुळे
