• Thu. May 1st, 2025

उमरग्यात तरुणाच्या आत्महत्येनंतर मराठा आंदोलक आक्रमक:मृतदेह तहसील कार्यालयात; वाहन जाळल्याने तणाव

Byjantaadmin

Sep 7, 2023

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील माडज (ता. उमरगा) येथील किसन माने (३०) या तरुणाने बुधवारी सायंकाळी गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर माडज गावासह तालुक्यातील अन्य गावांतील लोकांचा जमाव वाढल्याने तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.या घटनेनंतर मराठा तरुणांनी उमरगा बंदची हाक दिली आहे. तसेच आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा मृतदेह तहसील कार्यायलयासमोर ठेवण्यात आला. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.तहसील परिसरात मराठा समाजाचे आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलकांनी एक कार पेटवून दिली. त्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या आंदोलकांना चर्चेअंती शांत करण्यात आले. त्यानंतर मृतदेह घेऊन ते तरुणाची गावी माडजला अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले. दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बलिदानास शासन जबाबदार – सुळे

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, ‘माडज, जि. धाराशिव येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या किसन चंद्रकांत माने या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. हे सरकार अंतरवली येथील मराठा आंदोलकांवरील लाठिहल्ल्यानंतर तरुण वर्गात तसेच मराठा समाजात उसळलेल्या असंतोषाला योग्य पद्धतीने हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. या तरुणाच्या बलिदानास केवळ हे शासन जबाबदार आहे. किसन माने यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *