मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसागणिक चिघळत आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाने तब्बल 122 फूट उंचीच्या मोबाईल टॉवर चढून आंदोलन केले आहे. प्रशासनाने जालना येथील आंदोलकांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी या तरुणाने केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि मराठा आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी सुधाकर शिंदे शेकटा येथील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. या टॉवरची उंची जवळपास 122 फूट आहे. मराठा आरक्षण संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात यावा तर प्रशासनाने जालना येशील आंदोलकांची भेट घेत तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी आंदोलक सुधाकर शिंदे यांनी बोलताना केली आहे.
दरम्यान सुधाकर शिंदे टॉवरवर बसून आरक्षणाची मागणी करीत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहे. मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा सुधाकर शिंदे यांनी घेतल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमा झाले आहेत. विशेष म्हणजे शिंदे हे काल दुपारपासून टॉवरवर चढले असून, त्यांनी अन्नाचा कणही खाल्ला नसल्याची माहिती आहे.

काय आहेत मागण्या?
- मराठा आरक्षण संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात यावा.
- मराठा युवकांवरील झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.
- अंतरवाली सराटी याठिकाणी लाठीचार्ज केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.
- जिल्ह्यांमध्ये वन जनावरे सुसाट सुटली यामुळे शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान होत आहे तरी वनविभागाने वनजनावरांना बंदिस्त करावे.
- मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून पीक विमा व 100%दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. तसेच हेक्टरी 50 हजारांपर्यंत मदत देण्यात यावी अशी मागणी सुधाकर शिंदे यांनी केली आहे.
सुधाकर शिंदे यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळतात गावकरी घटनास्थळी जमा झाले. तर घटनास्थळी पोलिस देखील दाखल झालेत. प्रशासनाकडून खाली येण्यासाठी शिंदे यांची मनधरणी केली जात आहे. पण शिंदे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या सर्व मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे टावरवर बेमुदत आंदोलन सुरू राहिल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.