पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. मात्र, या अधिवेशनाचा कोणताही अजेंडा आम्हा खासदारांना देण्यात आलेला नाही, त्यामुळे या अधिवेशनाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. देशातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा विषय काढण्यात आला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला.
पावसाअभावी राज्यात दुष्काळी परिस्थिती
खानदेशातील जळगाव येथील जाहीर सभेपूर्वी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, सतीश पाटील आदी उपस्थित होते. त्यावेळी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बाबत बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला. राज्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करावी, असेही त्यांनी सांगितले.
आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा
राज्यात ओबीसी मराठा असा वाद कोणी निर्माण करीत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. ओबीसी समाजाला आपल्यावर अन्याय झाला, असे वाटू नये, यासाठी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून मराठा आरक्षण द्यावे, असा सल्लाही पवार यांनी सरकारला दिला.
ओबीसींना आपल्यावर अन्याय झाला असे वाटू नये
शरद पवार म्हणाले की, जालना येथे लाठीहल्ला केल्याबाबत सत्ताधारी विरोधकांना प्रश्न विचारीत आहेत. मात्र, त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहे, त्यांनीच त्याची चौकशी करावी. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे; परंतु ओबीसी समाजाला आपल्यावर अन्याय झाला, असे वाटून मतभेद निर्माण होऊ नये यासाठी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक 15 टकक्यांपर्यंत वाढवावी. संसदेत ते मंजूर करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
मुंबई बॉम्बस्फोटानंतर पाटलांनी राजीनामा दिला
जालना येथे झालेल्या लाठीहल्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, गोवारी समाजाच्या चेंगराचेंगरीनंतर मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. मुंबई बॉम्बस्फोटानंतर जबाबदारी घेऊन तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. हीच प्रेरणा घेऊन राज्यातील मंत्र्यांनी आता राजीनामा द्यावा.