मराठा आरक्षण आंदोलनास लातूर शहर जिल्हा काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा
लातूर:(प्रतिनिधी):मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली येथे सुरू असलेले आंदोलन मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या कृतीचा लातूर शहर जिल्हा
काँग्रेस आणि लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून मराठा समाजाच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळकाढू धोरण अवलंबण्यात येत आहे. या संदर्भाने मराठा समाजाकडून वेळोवेळी करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या वेळी सरकारच्या वतीने केवळ आश्वासनदिले जात आहे. या आश्वासनाची पूर्तता मात्र कधीच केली जात नाही. आंदोलन शमावण्यासाठी आश्वासन देणारे नेते कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्राकडे योग्य पद्धतीने पाठपुरावा होत नसल्यामुळे हे आरक्षण रखडले आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली येथे समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने उपोषण आणि आंदोलन सुरू असताना पोलिसांनी तिथे जाऊन
बळाचा वापर केला, आंदोलकावर अमानुषपणे लाठी हल्ला केला, अश्रुधुराचा वापर करण्यात आला. हवेत गोळीबारही केला.
मराठा समाजाने आजवर अनेक भव्य मोर्चे काढले परंतु कधीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती केली नाही . असे असताना अंतरावली येथे आंदोलकांवर पोलिसांकडून लाठी हल्ला करण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट झालेला नाही, सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी राज्यभरात समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे, लातूर जिल्ह्यातील समाज बांधवांकडूनही ठिकठिकाणी बंद पुकारण्यात येत आहेत, आंदोलने करण्यात येत आहेत, या संपूर्ण आंदोलनाला लातूर शहर जिल्हा काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे संयुक्त पत्र लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. किरण जाधव आणि लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून, पक्षाचे नेते माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनी विधानसभेत तसेच योग्य व्यासपीठावरून आवाज उठवलेला आहे त्यांच्यामार्फत यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पक्षाच्यावतीने जे जे करणे शक्य आहे ते सर्व काही पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे असेही या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.