विमाकंपन्याकडून शेतकऱ्यांची लूट; शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी दबाव टाकताच ४० हजार केले परत
निलंगा: शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेलं नुकसान वाढवून दाखवण्यासाठी विमा कंपनींच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्याकडून पैसे उकळल्याचा संचापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून जवळपास ४०००० रुपये घेतल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
या प्रकरणामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण काही केल्या थांबतांना दिसत नसल्याचं समोर आलं आहे. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी प्रशासन व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांकडून होणारी लूट यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.
अशातच लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची टक्केवारी वाढवून दाखवण्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले. या विमा प्रतिनिधींची पोलखोल करत शेतकऱ्याचे पैसे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी परत करायला लावलं आहे
निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागात शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडून होत आहेत. मदनसुरी भागात विमा प्रतिनिधी सर्रासपणे शेतकऱ्यांकडून पैसे घेवून नुकसानीची टक्केवारी जास्त दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत होता.
ही माहिती मिळताच लातूर जिल्हा शिवसेनाप्रमुख शिवाजी माने यांनी शेतकऱ्यांसमोर विमा कंपनीच्या ८ प्रतिनिधींचा पंचनामा शेतकऱ्यांसमोर केला. याच वेळी विमा कंपनीच्या ८ प्रतिनिधींनी प्रकरण आणखी अंगलट येऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून घेतलेले चाळीस हजार रुपये परत दिले. तर यापुढे शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास परिणाम वाईट होईल असा सज्जड दम दिल्यामुळे लुटारू विमा कंपनीच्या प्रतिनिधींची पोलखोल झाली आहे.