मुंबई : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागानं राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या पुणे हवामान केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाचे
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढच्या ४ ते ५ दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे..बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्यानं तिथं येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र असेल. त्या स्थितीचा फायदा होऊन राज्यात पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजनुसार ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत कोकण गोव्यात हलका-मध्यम पाऊस मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह पडेल तर काही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ५ ते ७ सप्टेंबरच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे
राज्यात कुठं पाऊस पडणार?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसांमध्ये विदर्भात पाऊस हजेरी लावू शकतो. हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात देखील पावसाचं कमबॅक होऊ शकतं. मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी हिंगोली, या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस
https://twitter.com/Hosalikar_KS?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1698249238499766428%7Ctwgr%5E505d16885f1922be5b41eb2cd5ae0f37c011e2ea%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fmonsoon-update-2023-imd-issue-yellow-alert-to-various-districts-predicted-rainfall-in-state%2Farticleshow%2F103326488.cms
भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पावसाकडे लक्ष
राज्यासह देशात गेल्या १०० वर्षांमध्ये जे घडलं नाही ते ऑगस्ट महिन्यात घडलं. ऑगस्ट महिन्यात पावसानं उघडीप दिली. ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट मोठी होती. त्यामुळं सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस पडेल आणि दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्याची आशा आहे.