जालना: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे धडधडीत खोटं बोलत आहेत. पोलीस गोळ्या घालत होते, म्हणूनच मराठा आंदोलक मला वेढा देऊन बसले होते. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेला दावा सपशेल खोटा आहे. राज्याच्या गृहमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला इतकं खोटं बोलणं शोभत नाही, अशी टीका अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनी केली. यावेळी मनोज जरांगे यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व दावे फेटाळून लावले. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला माणूस मरु देता येत नाही. मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे यांना वेढा टाकला होता. पण बाळा, तुमचे पोलीस गोळ्या घालत होते. म्हणूनच आंदोलकांनी मला वेढा टाकला होता. फडणवीस माझ्यावर उपचार करायचे होते, असे म्हणतात. पण गेल्या दोन दिवसांपासून इथे डॉक्टर होते का, हे तुम्ही कोणालाही विचारा. राज्याच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला असलं खोटं बोलणं शोभत नाही. मी तुमचं वक्तव्य ऐकलं नसतं तर बोलण्याची तसदीही घेतली नसती, असे कटू बोल मनोज जरांगे यांनी गृहमंत्र्यांना सुनावले.
तसेच जाळपोळ करत असलेल्या लोकांशी मराठा आंदोलनाचा कोणताही संबंध नाही, असा दावाही मनोज जरांगे यांनी केला. त्यांनी मराठा बांधवांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. आपल्याला कोणताही उद्रेक करायचा नाही. शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही मार्गाने आम्हाला पाठबळ द्या. गोंधळ घालणारे कार्यकर्ते आमचे नाहीत. आम्ही या सगळ्याची सखोल माहिती घेतली आहे. आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी हे कुठे गाड्या जाळत आहेत, कुठे रस्ते जाळत आहेत, कोणी धिंगाणा घालत आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि पोलिसांची माया येणाऱ्या गृहमंत्र्यांनी याचा शोध घ्यावा. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.