जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची सरकारमधील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली. पवार म्हणाले की, जेव्हा मी मुख्यमंत्री असताना गोवारी आंदोलनात काही लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा माझ्या सरकारमधील आदिवासी मंत्री म्हणून मधुकर पिचड यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला होता. तसाच काहीसा निर्णय आत्ताच्या सरकारने घेणे गरजेचे आहे. असे शरद पवार यांनी फडणवीसांचे नाव न घेता टोला लगावत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली.
राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांवर पलटवार
शरद पवारांच्या या मागणीपर विधानाला आता भाजप नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मुळात शरद पवार साहेब यांना देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. मागच्या पाच वर्षात मुख्यममंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण टीकवण्याचे काम कोणी केले असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, मला एक तरी उदाहरण दाखवावे किंवा सांगावे. ज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी काही केले आहे. काही योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाहीच.
…तर उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला पाहिजे
मराठा समाजाचे आरक्षण घालवलं किंवा गेले ते कोणाच्या नाकर्तेपणामुळे याचा विचार केला गेला पाहिजे. परंतू जेव्हा आरक्षण गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांचा राजीनामा शरद पवार यांनी का मागितला नाही. तेव्हा त्यांनी तो मागितला पाहिजे होता, असा प्रतिप्रश्न राधाकृष्ण विखे पाटलांनी उपस्थित केला.